पिंपरी (Pclive7.com) :- वारकऱ्यांना भेटवस्तू देण्यावरून सत्ताधारी भाजप आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. काल विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवाले ‘नास्तिक’ आहे. वारकऱ्यांना भेटवस्तू देण्याची परंपरा ‘खंडीत’ करत आहेत असे आरोप करत पैसे नसतील तर आमच्या नगरसेवकांच्या मानधनातून भेटवस्तू घ्या, अशी बोचरी टिका केली होती. त्या आरोपानंतर सत्ताधारी भाजपाने भेटवस्तू देण्याची तयारी दर्शवली आहे. शहरातील भाजपाचे आमदार, खासदार आणि नगरसेवकांच्या मानधनातून वारकऱ्यांना भेटवस्तू देण्यास आम्ही तयार आहोत. सोमवारी सर्व पक्षाच्या गटनेत्यांची बैठक घेऊन याबाबत निर्णय घेणार असल्याचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
पिंपरी चिंचवड महापालिकेकडून वारीच्या दिंडी प्रमुखांना भेटवस्तू देण्याची परंपरा होती. दोन वर्षापूर्वी दिल्या गेल्या भेटवस्तूंच्या खरेदीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप राष्ट्रवादीवर झाला होता. त्यानंतर गेल्यावर्षी पहिल्यांदाच सत्तेत आलेल्या भाजपावरही ताडपत्री खरेदीत भ्रष्टाचाराचा आरोप झाला होता. यंदाच्या वर्षी उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे कोणतीच भेटवस्तू द्यायची नाही असा निर्णय सत्ताधाऱ्यांनी घेतला होता.
एकनाथ पवार म्हणाले, देहू आणि आळंदी या दोन्ही देवस्थानच्या विश्वस्थांची चर्चा केली होती. वारकऱ्यांची भेटवस्तू द्या, अशी कुठलीच मागणी नाही. त्यापेक्षा त्यांना सोई-सुविधा पुरवा असे सांगितले होते. म्हणूनच यंदाच्या वर्षी आम्ही वारकऱ्यांना वारी दरम्यान आंघोळीचे पाणी, शौचालय व्यवस्था, आरोग्य सुविधा आदी सर्व सेवा पुरवणार आहोत. मात्र विरोधाला विरोध करण्याचं काम विरोधी पक्षनेते करत आहेत. आमच्या दोन्ही आमदारांच्या घरात सांप्रदायिक वारसा आहे. कोण ‘नास्तिक’ हे राष्ट्रवादीने आम्हाला शिकवू नये, असा टोला एकनाथ पवार यांनी दत्ता साने यांना लगावला.





















Join Our Whatsapp Group