पिंपरी (Pclive7.com):- २३ जून पासून राज्य सरकारने प्लास्टिक बंदीचा निर्णय लागू केला आहे. प्लास्टिक वापरावर जो दंड आकारण्यात येतो आहे त्यावर व्यापारी वर्ग नाराज आहे. याचे पडसाद पुण्यात उमटले होते, व्यापारी वर्गाने आपली दुकाने बंद ठेवून याचा निषेध केला होता. त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना समोरे जावे लागते आहे. पिंपरीत एका बेकरी दुकानदाराच्या रागाचा पारा इतका चढला की प्लास्टिक पिशवी मागणाऱ्या ग्राहकाला त्याने बेदम मारहाण केली. ग्राहकाने प्लास्टिक कॅरीबॅगची मागणी केल्याने आधी दुकानदार आणि ग्राहक यांच्यात वादावादी झाली, त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. बेकरी दुकानदाराने ग्राहकाला बांबूने मारहाण केली.
या घटने प्रकरणी पिंपरी पोलिसात ग्राहक मॅनवेल झेवियर दास (वय-३४ रा.मासूळकर वसाहत) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार बेकारी दुकानदार नसरुद्दीन अन्सारी (वय-२७ रा.नेहरू नगर) याच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अद्याप संबंधित संशयित आरोपीना ताब्यात घेण्यात आले नाही. याचा तपास पिंपरी पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मॅनवेल झेवियर दास हे शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास उद्यमनगर येथील ओव्हन फ्रेश बेकरी येथे खारी आणि टोस्ट आणण्यासाठी गेले होते. खारी आणि टोस्ट खरेदी केल्यावर दास यांनी दुकानदार याच्याकडे प्लास्टिक कॅरिबॅगची मागणी केली. मात्र यावर दोघांमध्ये बराच वेळ तू तू मैं मैं झाली आणि अखेर यांच्यात वाद झाला,दुकानदार नसरुद्दीनसह तीन कामगारांनी ग्राहक मॅनवेल यांना बांबूने डोक्यात फटके मारत बेदम मारहाण केली. या घटनेत ते गंभीर जखमी झाले आहेत. यात मॅनवेल यांच्या डोक्यात पाच टाके पडले आहेत. याविषयी त्यांनी पिंपरी पोलिसात फिर्याद दिली आहे, त्यानुसार दुकानदार नसरुद्दीनसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक नाही.अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मधुसूदन घुगे हे करत आहेत.





















Join Our Whatsapp Group