पिंपरी (Pclive7.com):- महापौरपदासाठी आपण प्रबळ दावेदार असल्यामुळेच माझे राजकीय खच्चीकरण करण्यासाठी विरोधकांकडून नाहक त्रास दिला जातोय. मात्र, सत्य कधीही लपून राहत नाही. आपली कागदपत्र खोटी असती तर उच्च न्यायालयाने आपले पद रद्द केले असते. आता जात वैधता पडताळणी समितीसमोर सर्व कागदपत्र सादर करुन त्याची सत्यता पडताळणी करुन घेवू. फेरपडताळणीत सत्य सर्वांसमोर येईलच. १५ जून २०१८ उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावरुन माझे राजकीय विरोधक गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न करत असल्याचे मत भाजप नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी व्यक्त केले आहे.
शत्रुघ्न काटे यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटलयं की, मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात माझ्या कुणबी जात वैधतेची फेर तपासणी करावी असा आदेश जात पडताळणी समितीला दिला आहे. हा आदेश देताना माझे यापूर्वीचे जात वैधता न्यायालयाने रद्द केलेले नाही. मात्र माझे राजकीय विरोधक या निकालाचा चुकीचा अन्वयार्थ लावून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत.
जात वैधतेची फेरपडताळणी करण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने जात वैधता पडताळणी समितीला दिला आहे. त्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. २०१७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत रहाटणी-पिंपळे सौदागर (प्रभाग क्रमांक २८) मधून ओबीसी राखीव प्रवर्गातून मी भाजपकडून निवडणूक लढवली आहे. मात्र, बनावट कुणबी दाखल्याच्या आधारे निवडणूक लढवल्याचा आरोप करत राजकीय विरोधकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटीशन (नं. 556/2017 दिनांक 05/01/2017 ) दाखल करण्यात आली आहे. त्यावर उच्च न्यायालयात नुकतीच सुनावणी झाली, यामध्ये उच्च न्यायालयाने २९ सप्टेंबर २०१८ पर्यंत जात वैधतेची फेर पडताळणी करण्याचे आदेश जात वैधता पडताळणी समितीला दिले आहेत. तसेच जात दाखल्यासंदर्भात जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने योग्य कागदपत्रांच्या आधारे तपशीलवार कारण मिमांसा दिली नसल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने तपशीलवार कारण मिमांसा करुन निर्णय घेण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत.
विद्यमान महापौर नितीन काळजे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे यांच्या जात प्रमाणपत्राबाबतही न्यायालयाने फेरपडताळणीचे आदेश दिले होते,त्यानंतर जात पडताळणी समितीसमोर त्यांचा अर्ज वैध ठरला होता. पिंपरी पालिका इतिहासातील या दोन प्रकरणानंतर माझ्या बाबतीतही न्यायालयाने जात प्रमाणपत्र फेरपडताळणीचे आदेश दिले आहेत. त्याऊपर, २९ सप्टेंबर २०१८ पूर्वी सुनावणी घेवून या कागदपत्रांची समितीला फेरपडताळणी करुन निर्णय घ्यावा लागणार आहे.
महापौरपदासाठी आपण प्रबळ दावेदार असल्यामुळे आपले राजकीय खच्चीकरण करण्यासाठी विरोधकांकडून आपल्याला हकनाक त्रास दिला जात आहे. मात्र, सत्य कधीही लपून राहत नाही. आपली कागदपत्र खोटी असती तर उच्च न्यायालयाने आपले पद रद्द केले असते. आता जात वैधता पडताळणी समितीसमोर सर्व कागदपत्र सादर करुन त्याची सत्यता पडताळणी करुन घेवू. फेरपडताळणीमध्ये सत्य सर्वांसमोर येईलच असे शत्रुघ्न काटे यांनी म्हटले आहे.





















Join Our Whatsapp Group