पिंपरी (Pclive7.com):- रावेत येथील साई मंगल सोसायटीमध्ये राहणाऱ्या १८ वर्षीय विद्यार्थ्याने राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवारी पहाटे पावणेतीनच्या सुमारास उघडकीस आली. अवधूत अरविंद मोहिते (वय १८, रा. साई मंगल सोसायटी, रावेत; मुळगाव -वाखरी, ता. फलटण, जि. सातारा) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवधूत हा रावेत येथील पीसीसीओ कॉलेजमध्ये बारावी वर्गात शिक्षण घेत होता. सोमवारी पहाटे त्याने आपल्या खोलीतील सिलिंग फॅनला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. काही वेळाने ही घटना त्याच्या रूममेटच्या लक्षात आली. त्याने तत्काळ शेजाऱ्यांच्या मदतीने अवधूतला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

अवधूत हा अभ्यासू आणि शांत स्वभावाचा विद्यार्थी होता. गेल्या काही दिवसांपासून तो अभ्यासाच्या ताणात असल्याची माहिती त्याच्या मित्रांनी व नातेवाईकांनी दिली. अभ्यासाच्या ताणातून त्याने आत्महत्या केल्याची शक्यता नातेवाईकांनी पोलिसांशी बोलताना व्यक्त केली आहे. रावेत पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
























Join Our Whatsapp Group