
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्यापाठोपाठ अतिरिक्त आयुक्त (क्रमांक एक) प्रदीप जांभळे पाटील यांची शुक्रवारी (दि.३१) बदली झाली आहे. त्यांची सेवा त्यांच्या मूळ प्रशासकीय विभागाकडे म्हणजेच वित्त विभागाकडे वर्ग करण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी छापवाले यांनी शुक्रवारी (दि.३१) काढले आहेत.

प्रदीप जांभळे पाटील हे वसई-विरार महापालिकेमध्ये उपायुक्त म्हणून कार्यरत होते. २२ सप्टेंबर २०२२ रोजी त्यांची प्रतिनियुक्तीने महापालिकेच्या आतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यापूर्वीच राज्य शासनाने महापालिकेमध्येच उपायुक्त असलेल्या स्मिता झगडे यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली होती. शासनाने आपल्याच आदेशावर घूमजाव करत पुन्हा जांभळे यांची नियुक्ती केली होती. त्यामुळे झगडे यांनी मॅटमध्ये दावा दाखल केला होता. मॅटमध्ये जांभळे पाटील यांच्या बाजूने निर्णय लागला. त्यानंतर शासनाने त्यांना दोन वर्ष मुदतवाढ दिली. त्यांची मुदत १८ सप्टेंबरला संपली होती. जांभळे पाटील हे बदलीच्या तयारी होते. अखेर, त्या संदर्भातील आदेश आज आला. महापालिकेतील प्रतिनियुक्ती संपुष्टात आणत त्यांची सेवा वित्त विभागाकडे प्रत्यार्पित केली आहे. यापूर्वी आयुक्त शेखर सिंह यांची ७ ऑक्टोबरला नाशिक येथील कुंभमेळा आयुक्त म्हणून बदली झाली आहे.

अतिरिक्त आयुक्तपदी कोण येणार?
गेल्या आठवड्यात महसूल विभागाने मोनिका ठाकूर यांची पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. मात्र, त्यांना पदभार स्वीकारण्यासाठी नगरविकास विभागाचा आदेश आवश्यक आहे. नगर विकास विभागाचा आदेश असल्याशिवाय कोणत्याही अधिकाऱ्याला पदभार स्वीकारता येत नाही. त्यामुळे ठाकूर यांची महसूल विभागाने जरी बदली केली असली तरी त्यांना नगर विकास विभागाचा नियुक्ती आदेश आवश्यक असणार आहे. प्रदीप जांभळे यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागेवर मोनिका ठाकूर यांची वर्णी लागणार की कोणी दुसरा अधिकारी अतिरिक्त आयुक्त म्हणून येणार याकडे लक्ष लागले आहे.
























Join Our Whatsapp Group