हिंजवडी (Pclive7.com):- हिंजवडी परिसरात प्रेमसंबंधातून तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि.०१) दुपारी उघडकीस आली आहे. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या हिंजवडी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य आरोपीसह तिघांनाही ताब्यात घेतले आहे.

जखमी तरुणी सध्या साखरे वस्ती, हिंजवडी येथे राहायला असून तिच्या मानेवर, डोक्यावर आणि हातावर गंभीर वार करण्यात आले आहेत. याप्रकरणी योगेश भालेराव (वय २५, रा. कासारसाई), प्रेम लक्ष्मण वाघमारे (वय २०), आणि एक अल्पवयीन साथीदार यांना हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवार दुपारी सुमारे ४.२० वाजता, हिंजवडीतील एस बँकेच्या मागे, शेल पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली. तरुणीच्या ओळखीचा योगेश भालेराव (वय २५, रा. कासारसाई) या तरुणाने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने कोयत्याने हल्ला केला. हल्ल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. प्रेमसंबंधातील वादातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपींनी सपासप वार करून तरुणीला गंभीर जखमी केले असल्याचे साक्षीदारांनी सांगितले.

हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. घटनास्थळाचा पंचनामा करून शस्त्र जप्त करण्यात आले आहे.
























Join Our Whatsapp Group