पिंपळे गुरव (Pclive7.com):- नादुरुस्त ओपन जिमचे साहित्य, भटक्या कुत्र्यांचा वावर, आणि अस्वच्छतेचे साम्राज्य अशा विविध समस्यांच्या विळख्यात पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यान अडकले असल्याची माहिती मानवी हक्क संरक्षण जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी दिली आहे.

अण्णा जोगदंड यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानच्या पार्किंग मध्ये कचऱ्याचे साम्राज्य झाले आहे, या ठिकाणी ठराविक ठिकाणचाच कचरा उचलला जातो, परंतु पार्किंगमधील झाडाच्या मधला व अडगळीतला कचरा उचलला जात नाही. झाडांच्या बुंध्याजवळ मोकळ्या तसेच कोपऱ्यात चहाचे कप, प्लास्टिक पिशव्या खूप इतरत्र पसरलेल्या दिसतात. मी स्वतः दररोज पहाटे उद्यानात जात असतो. येथे उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. उद्यान विभागाचे कर्मचारी अजय जाधव यांना फोनवरून विचारणा केली असता ते उडवाउडवीची व खोटी माहिती देतात. पार्किंगची स्वच्छता आरोग्य विभागाकडे आहे असे सांगितले जाते.

या उद्यानात दररोज अनेक नागरिक मॉर्निंग वॉक तसेच फेरफटका मारायला येत असतात. या ठिकाणी अनेक भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून लहान मुले तथा ज्येष्ठ नागरिकांवर या कुत्र्यांचा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या उद्यानात ओपन जीमचे साहित्य गेल्या अनेक महिन्यांपासून नादुरुस्त झालेले आहे. अनेक वेळा नागरिकांनी याबाबत तक्रारी केल्या आहेत. मात्र उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. तरी तातडीने या उद्यानाकडे प्रशासनाने लक्ष देऊन समस्यांच्या विळख्यातून बाहेर काढावे अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहे.





















Join Our Whatsapp Group