
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीने प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे. नुकत्याच जारी केलेल्या यादीत तळवडे प्रभाग क्रमांक १२ मधील हजारो मतदारांची नावे शेजारील चिखली प्रभागात टाकण्यात आल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. विशेष म्हणजे तळवडे प्रभागात सर्वाधिक आक्रमक राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रमुख चेहरा असलेले माजी नगरसेवक पंकज भालेकर यांच्या राहत्या घरातील यादीतून त्यांचे स्वतःचेच नाव शेजारच्या चिखली प्रभागात टाकण्यात आल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

तळवडे प्रभाग १२ मधील यादी भाग ७ मधील तब्बल १२६१ मतदान एकाच झटक्यात शेजारच्या चिखली प्रभाग एक मध्ये शिफ्ट करण्यात आली, त्यामुळे संपूर्ण प्रभागात एकच खळबळ उडाली आहे. अशी अनेक प्रकार शहरातील ३२ प्रभागात दिसून येत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदारांचे स्थलांतर करून प्रशासनाने कोणाचा फायदा करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा प्रश्न सामान्य नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

मागील आठ वर्षांत रेडझोन हद्दीतील प्रभागात अडथळ्यांच्या काळात, प्रसंगी स्थानिक आमदार आणि प्रशासनाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेऊनही तळवडे प्रभागात विकासाची गंगा आणण्यात पंकज भालेकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्य चेहरा म्हणून पाहिले जाणाऱ्या नेत्याचेच नाव यादीतून गायब केल्याने नागरिक आणि समर्थकांमध्ये संताप उसळला आहे.

स्थानिक नागरिकांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देत प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मतदार यादीतील गंभीर घोळ निवडणुकीच्या पारदर्शकतेवर थेट परिणाम करणारा असल्याने ही चूक की जाणूनबुजून केलेले राजकीय डावपेच, याचा सखोल तपास करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, प्रभागात उलट सुलट चर्चेला जोर आला असून मतदार यादीतील भोंगळ कारभाराचा फटका आगामी निवडणुकीत निश्चितच बसणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

























Join Our Whatsapp Group