पिंपरी (Pclive7.com):- १३,३३३ प्रयोगांचा विक्रम.. ४२ वर्षांची अविरत नाट्यसेवा.. ४० हजार तास रंगभूमीवर.. लाखो प्रेक्षकांचे मनोरंजन.. मराठी नाट्यसृष्टीचे वैभव म्हणजे प्रशांत दामले.. यशाची हमी, निखळ मस्ती, शंभर टक्के मनोरंजनाची खात्री म्हणजे प्रशांत दामले..!
(लेखन – बाळासाहेब जवळकर, ज्येष्ठ पत्रकार)

केवळ नाट्यक्षेत्रच नव्हे तर चित्रपट, मालिका, टीव्ही शो, जाहिराती अशा विविध क्षेत्रात आपली छाप पाडणारा, आकाशाला गवसणी घालणारा हरहुन्नरी कलावंत म्हणजे प्रशांत दामले.. केवळ स्वत:च्या नावावर सर्वाधिक हाऊसफुल्ल शो घेणारा मराठी नाट्यक्षेत्रातील हुकमी एक्का म्हणजे प्रशांत दामले.. खऱ्या अर्थाने नटसम्राट आणि दिलखुलास व्यक्तीमत्व असलेल्या प्रशांत दामले यांनी वयाच्या पासष्ठीकडे वाटचाल सुरू केली आहे. त्यातील ४२ वर्षांच्या म्हणजेच १५,३४० दिवसांच्या कारकीर्दीत त्यांनी जवळपास ३५ हून अधिक नाटकांमध्ये काम केले. बहुतांशी नाटके यशस्वीच ठरली.
सर्व मिळून तब्बल १३,३३३ नाट्यप्रयोग पूर्ण केले आहेत. अगदीच तासांचा हिशेब केला तर या प्रयोगांसाठी जवळपास ४० हजार तास प्रशांत दामले यांचा रंगभूमीवर वावर राहिला आहे. रविवारी, १६ नोव्हेंबरला पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात मान्यवरांच्या उपस्थितीत १३,३३३ या विक्रमी प्रयोगासाठी नेत्रदीपक सोहळा पार पडला. प्रशांत दामले यांच्या अभिनयाची सर्वात मोठी ताकद म्हणजे विनोद या प्रकाराला त्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हाताळले.

कृत्रिम विनोदात ते रमले नाहीत. विनोद म्हणजे अचूक टायमिंग, चेहऱ्यांवरील हलकेफुलके बदल, खोडकर हावभाव, खुसखुशीत संवादांच्या माध्यमातून प्रेक्षकांना दोन- अडीच तास खिळवून ठेवण्याची किमया त्यांनी साधली. स्वच्छ, निर्मळ, विनोद म्हणजे काय हे दामले यांच्या नाटकातून पहायला मिळते. दामले उत्कृष्ट गायकही आहेत. ‘सुख म्हणजे नक्की काय असते’ हे गाणे म्हटल्याशिवाय त्यांची कोणतीही मैफल पूर्ण होत नाही.
याशिवाय, ‘आम्ही सारे खवय्ये’ हा कार्यक्रम त्यांनी नऊ वर्षे केला. ‘किचन कल्लाकार’ असो की एखाद्या वाहिनीवर परिक्षक असो. ते विविध माध्यमातून झळकत राहिले. ‘मुंबई पुणे मुंबई’ असो की ‘मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी’ किंबहुणा ‘सवत माझी लाडकी’ सिनेमा लागला की, आजही त्यातील एकतर्फी प्रेम करणारा डॉक्टर लक्ष वेधून घेतो. प्रशांत दामले फॅन फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक कलाकार घडवले, अनेकांना संधी दिली. वेळोवेळी गरजवंताना मदतीचा हात दिला. लातूर भूकंपग्रस्तांना त्यांनी सात लाखांची मदत केली होती. त्याचपध्दतीने याहीवेळी त्यांनी राज्यातील पूरग्रस्तांसाठी १३ लाखांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिली.

महाराष्ट्र राज्य पुरस्कार, कलादर्पण पुरस्कार, कलागौरव पुरस्कार असे राज्यपातळीवरील विविध सन्मान त्यांना मिळाले. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या हस्तेही त्यांचा सत्कार झाला. ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये प्रशांत दामले यांच्या नावावर तब्बल पाच रेकॉर्ड्स नोंदली गेली आहेत. एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या नाटकांचे ४ प्रयोग, ३६५ दिवसांत ४५२ प्रयोग, ३६५ दिवसात ४६९ प्रयोग आणि एकाच दिवशी तीन नाटकांचे पाच प्रयोग आदी विक्रमांचा यात समावेश आहे.
रंगभूमीवरील नवनवीन आव्हाने त्यांनी पेलली. त्यांची मेहनत, त्याग, शिस्त, विनोदबुद्धी आणि सर्वात महत्त्वाचे प्रेक्षकांशी असलेले नाते, नाटकाविषयीची निष्ठा अशा साऱ्या गोष्टींमुळेच मराठी रंगभूमीवर आजपर्यंत कोणत्याही अभिनेत्याला न मिळालेली लोकप्रियता प्रशांत दामले यांना मिळाली आणि ती त्यांनी टिकवून ठेवली. प्रशांत दामले यांच्या या प्रवासात अनेक चढउतार आले. करोनासारखी अचानक उद्भवणारी संकटे आली. आरोग्याचे प्रश्नही आले, पण रंगभूमीची अथक सेवा त्यांनी सुरूच ठेवली.

मराठी रंगभूमीचा इतिहास लिहिताना स्वतंत्र अध्याय किंबहुणा सर्वात उज्ज्वल नाव म्हणून प्रशांत दामले यांची नोंद करावी लागेल. दामले यांच्या नाट्यसेवेची तथा एकूणच विक्रमी कारर्कीदीची दखल घेत राज्यशासनाने ‘पद्मश्री’ किंवा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करायलाच हवा. त्यासाठी कोणत्याही महुर्ताची वाट पाहण्याची गरज नाही. एखादा प्रतिभावंत कलाकार त्याच्या क्षेत्रात कार्यरत असतानाच त्याचा गौरव होणे, हे कधीही चांगले किंबहुणा तेच अधिक गरजेचे आहे.
शासन देईल तेव्हा देईल. महाराष्ट्रातील लाखो रसिक प्रेक्षकांनी तसेच जगभरात विस्तारलेल्या मराठी बांधवांनी यापूर्वीच दामले यांना आपल्या प्रेमातून हे पुरस्कार देऊ केले आहेत. प्रेक्षकांच्या हृदयात कायमचे घर करण्याचा विक्रम प्रशांत दामले यांच्या नावावर आहे. त्यांचा प्रवास पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी आणि आदर्श ठरेल, असाच आहे. आज आचार्य अत्रे असते तर, दहा हजार वर्षांत असा महान कलाकार होणार नाही, अशा शब्दांत प्रशांत दामले यांचा गौरव नक्कीच केला असता.
प्रत्येक कलाकृतीला भरभरून दाद
प्रशांत दामले यांच्या कारकीर्दीला १९७८ मध्ये सुरूवात झाली. विविध अडचणींवर मात करत त्यांची वाटचाल सुरू असताना १९९२ मध्ये ‘गेला माधव कुणीकडे’ च्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्यांना पहिल्यांदा ब्रेक मिळाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. ‘टूरटूर’ ‘मोरूची मावशी’ ‘ब्रम्हचारी’ ‘लग्नाची बेडी’ ‘बे दुणे पाच’ ‘चार दिवस प्रेमाचे’ ‘प्रियतमा’ ‘साखर खाल्लेला माणूस’ ‘जादू तेरी नजर’ ‘कार्टी काळजात घुसली’ ‘आम्ही दोघं राजाराणी’ ‘एका लग्नाची गोष्ट’ ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ ‘सारखं काहीतरी होतयं’ ‘शिकायला गेलो एक’ अशी त्यांच्या लोकप्रिय नाटकांची यादी मोठी आहे.
‘पुढच पाऊल’, ‘वाजवा रे वाजवा’, ‘सवत माझी लाडकी’, ‘पसंत आहे मुलगी’, ‘तू तिथं मी’, ‘पुणे-मुंबई-पुणे’, ‘मुक्काम पोस्ट बोबिंलवाडी’ असे अनेक सिनेमे त्यांनी केले. नाटक असो की सिनेमा त्यांच्या प्रत्येक कलाकृतीला रसिकांनी भरभरून दाद दिली.

























Join Our Whatsapp Group