पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार यादी विभाजनातील गंभीर त्रुटी व गोंधळ दूर करून, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे. या संदर्भात पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्य निवडणूक आयोगाला निवेदन देण्यात आले असल्याची माहिती शहराध्यक्ष योगेश बहल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेत शहर समन्वयक विलास लांडे, पक्ष प्रवक्ते अजित गव्हाणे, मंगलाताई कदम, भाऊसाहेब भोईर, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, मोरेश्वर भोंडवे, फजल शेख, उल्हास शेट्टी, भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर, श्रीधर वाल्हेकर, विनायक रणसुभे आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याच्या प्रक्रियेत, विशेषतः विभाजनामध्ये, मोठ्या प्रमाणावर गोंधळ झालेला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या दि.१६ जुलै, २०२५ च्या आदेशात स्पष्ट निर्देश दिलेले असूनही, प्रत्यक्ष अंमलबजावणीत गंभीर अनियमितता आढळल्या आहेत.

आयोगाच्या निर्देशांचे उल्लंघन आणि मतदार यादीतील गोंधळ खालील प्रमाणे..
१.आपल्या आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे की, प्रभागाच्या हद्दीवर राहणाऱ्या मतदारांच्या संदर्भात विशेष दक्षता घेणे आणि त्यासाठी आवश्यकतेनुसार स्थळ निरीक्षण करणे आवश्यक आहे. परंतु, प्रत्यक्षात कोणतीही शाहनिशा न करताच संपूर्ण यादी भाग किंवा परिसर परस्पर मूळ प्रभागाऐवजी दुसऱ्याच प्रभागात समाविष्ट करण्यात आला आहे. यामुळे अनेक प्रभागांत ५ हजार पेक्षा जास्त मतदारांचा घोळ झाला आहे. मतदार याद्यांचे विभाजन करताना स्थळ पाहणीचा अभाव स्पष्टपणे दिसून येत आहे.
२.आपल्या आदेशानुसार, ‘सेक्शन ॲड्रेस’ मोघम, अपूर्ण किंवा चुकीचे असल्यास, केवळ त्याचाच आधार न घेता, इमारत/गृहनिर्माण संस्था प्रत्यक्षात ज्या भौगोलिक हद्दीत आहे, त्याच प्रभागात मतदारांची नावे समाविष्ट करण्याची काळजी घ्यावी. मात्र, या निर्देशाकडे दुर्लक्ष करून, वस्त्या आणि परिसरांची नावे चुकीच्या पद्धतीने दुसऱ्या प्रभागात समाविष्ट करण्यात आली आहेत, ज्यामुळे ‘एका प्रभागाच्या हद्दीतील मतदारांची नावे अन्य प्रभागाच्या मतदार यादीत समाविष्ट’ होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडले आहेत.
३.मतदारांना आपले नाव नेमके कोणत्या प्रभागात समाविष्ट आहे, हे ऑनलाईन/ॲपद्वारे शोधण्याची कोणतीही सोय उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे मतदारांना आपले नाव शोधणे अत्यंत जिकीरीचे झाले आहे. मनपाच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या PDF स्वरूपातील याद्यांमध्ये ‘सर्चिंग’ (Searching) सुविधा उपलब्ध नाही, त्यामुळे मतदारांना मॅन्युअली (Manual) नाव शोधावे लागत आहे. PDF याद्यांमध्ये मतदारांचे फोटो उपलब्ध नाहीत, ज्यामुळे एकाच नावाच्या दोन मतदारांबाबत अधिक गोंधळ निर्माण होत आहे.
४.चुकीच्या विभाजनामुळे मोठ्या प्रमाणात वस्त्या आणि परिसरांना हरकत दाखल करण्यासाठी नाहक मनस्ताप सोसावा लागत आहे. जिथे एकाच परिसरातील २०० ते ३०० नावे चुकीच्या पद्धतीने विभाजित झाली आहेत, अशा सामूहिक त्रुटी निदर्शनास आणून दिल्यानंतर, प्रशासनाकडून Suo-Moto कार्यवाही करण्याऐवजी टाळाटाळ केली जात आहे.
५.प्रारूप मतदारयाद्यांमध्ये दुबार व तिबार नोंद असलेल्या मतदारांची संख्या तब्बल एक लाखापेक्षा जास्त आहेत. तसेच आपल्या मार्फत सुमारे ९२ हजार दुबार नावांची यादी महानगरपालिकेकडे देण्यात आलेली आहे तसेच आम्ही देखील शहरांतर्गत असलेली सुमारे १२ हजार दुबार/तिबार नावे पुराव्यासह महानगरपालिका निवडणूक विभागाकडे सादर केलेली आहे. परंतु आम्ही सादर केलेल्या आणि आपण दिलेल्या दुबार मतदारांबाबत अद्यापही कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही हे अत्यंत खेदाने नमूद करावे लागत आहे.

गंभीर त्रुटी तातडीने दूर करून निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष व पारदर्शक राबवावी…
१.मतदाराला आपले नाव ऑनलाईन/ॲपवर त्याच्या नाव, पत्ता किंवा मतदान ओळखपत्र क्रमांकावरून त्वरित शोधता येईल, अशी युजर-फ्रेंडली सर्च सुविधा तातडीने उपलब्ध करून द्यावी.
२.वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या PDF मतदार याद्यांमध्ये ‘सर्च’ (Search) करण्याची सुविधा त्वरित अंतर्भूत करावी, जेणेकरून मतदारांना मॅन्युअल शोधण्याची गैरसोय टाळता येईल.
३.मोठ्या प्रमाणात झालेल्या चुकीच्या विभाजनावर, विशेषतः पूर्ण यादी भाग किंवा वस्ती चुकीच्या प्रभागात समाविष्ट झाल्याच्या ठिकाणी, स्थळ पाहणी करून suo-moto (स्वतःहून) दुरुस्ती करण्याची कार्यवाही प्राधिकृत अधिकाऱ्यांमार्फत तातडीने सुरू करावी.
४.प्रभाग स्तरावर मतदारांना त्यांचे नाव व प्रभाग शोधण्यासाठी विशेष सहायता केंद्रे (Help Centers) त्वरित उपलब्ध करून द्यावीत.
५.प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करताना आयोगाच्या आदेशातील परिच्छेद २ नुसार, केवळ सेक्शन ॲड्रेस नव्हे, तर प्रत्यक्ष भौगोलिक स्थान तपासून केलेल्या दुरुस्त्या अंतिम यादीत समाविष्ट केल्याची खात्री करावी.
६.प्रारूप मतदारयाद्यांमध्ये मोठ्याप्रमाणात घोळ झाले असल्याने सदर प्रारूप याद्यांबाबत हरकती सूचना दाखल करण्यासाठी देण्यात आलेली मुदत ही वाढविण्यात यावी.
७.प्रारूप मतदारयाद्यांबाबत हरकती / सूचना दाखल करण्यासाठी ऑनलाईन सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात यावी.
८. दुबार / तिबार मतदारांबाबत आपल्या मार्फत देण्यात आलेल्या आदेशाचे काटेकोरपणे व तातडीने पालन करण्यासाठी एक स्वतंत्र कक्ष स्ताप्न करून त्याबाबतच्या कार्यवाही बद्दलचे स्थिती सर्वसामान्य जनतेच्या माहितीसाठी उपलब्ध करून द्यावी.
९.मतदारयाद्यांमधील त्रुटी मान्यता प्राप्त राजकीय पक्षांच्या मार्फत लाक्षात आणून दिल्या त्याबाबतची सखोल चौकशी करून दुरुस्ती करण्याची मुभा महानगरपालिका आयुक्तांना द्यावी जेणेकरून सामान्य मतदारांना होणारा मनस्ताप टाळता येईल.

या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन, मतदारांना होणारा मनस्ताप त्वरित थांबवावा आणि निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक ते आदेश त्वरित पारित करण्याकरिता राज्य निवडणूक आयुक्त, राज्य निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी पुणे, आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्याकडे करण्यात आली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाकडे केलेल्या या मागणीनंतर राज्य निवडणूक आयोग नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं देखील तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.

























Join Our Whatsapp Group