पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज नागरिकांना थेट पाहता यावे, यासाठी ते ‘लाईव्ह’ (थेट प्रक्षेपण) करण्याची मागणी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे.

भाऊसाहेब भोईर यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ही राज्यातील महत्त्वाची आणि ‘स्मार्ट सिटी’ म्हणून ओळखली जाणारी महानगरपालिका आहे. शहराच्या विकासासंबंधी महत्त्वाचे निर्णय सर्वसाधारण सभेत घेतले जातात. विविध विकासकामांवर चर्चा, ठराव मंजुरी आणि करदात्या नागरिकांच्या निधीचे नियोजन याच सभेत होते.

सध्याच्या डिजिटल युगात नागरिकांना त्यांच्या लोकप्रतिनिधींचे कामकाज प्रत्यक्ष पाहण्याची अपेक्षा आहे. प्रशासनात पारदर्शकता राहावी आणि लोकशाहीवरील विश्वास वृद्धिंगत व्हावा, यासाठी सभेचे कामकाज महानगरपालिकेच्या अधिकृत युट्यूब चॅनेल किंवा फेसबुक पेजवरून थेट प्रक्षेपित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिका येथे सर्वसाधारण सभेचे कामकाज ‘लाईव्ह’ दाखविण्याची सुविधा उपलब्ध असून, पिंपरी-चिंचवडसारख्या स्मार्ट सिटीमध्येही हा उपक्रम राबविणे सहज शक्य असल्याचे भोईर यांनी स्पष्ट केले आहे. जनहित आणि पारदर्शकता लक्षात घेऊन आगामी सर्वसाधारण सभेपासून हे कामकाज ‘लाईव्ह’ करण्याबाबत संबंधित विभागाला त्वरित आदेश द्यावेत, अशी मागणी भाऊसाहेब भोईर यांनी केली आहे.





















Join Our Whatsapp Group