पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील निगडी सिग्नल ते चिंचवड स्टेशन या मुख्य मार्गावर सुरू असलेल्या महामेट्रोच्या कामामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार पुढे आली आहे. गेल्या एक ते दीड वर्षांपासून सुरू असलेल्या या कामामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून अनेक लहान-मोठे अपघात घडत आहेत. या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा २५ मार्च रोजी निगडी सिग्नल येथे मनसेच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिला आहे.

निगडी सिग्नल ते आकुर्डी दरम्यानचा रस्ता हा शहरातील अत्यंत वर्दळीचा मार्ग मानला जातो. या मार्गावरून दररोज हजारो प्रवासी तसेच मोठी आणि लहान वाहने ये-जा करतात. मात्र, महामेट्रोच्या कामामुळे रस्त्याची अवस्था बिकट झाली असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत मनसेचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष तथा माजी नगरसेवक सचिन चिखले यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदन दिले आहे.

“महामेट्रोकडे मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध असतानाही कामाकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे,” असे त्यांनी नमूद केले. तसेच श्रीकृष्ण मंदिर परिसरातील रस्ता गेल्या एक वर्षांपासून खोदून ठेवला असून तेथे कोणतेही काम झाले नसल्याचीही तक्रार त्यांनी केली. रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा २५ मार्च रोजी निगडी सिग्नल येथे मनसेच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.




















Join Our Whatsapp Group