पुणे (Pclive7.com):- केसामध्ये अस्वच्छतेमुळे निर्माण झालेली जट काढण्याचे काम पुण्यातील अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या (अंनिस) कार्यकर्त्या नंदिनी जाधव करत आहेत. ४ वर्षांपासून सुरू केलेल्या या जट निर्मूलनाच्या कार्यात त्यांनी अनेक महिलांना मदतीचा हात दिला. मंगळवारी आणखी एका महिलेला त्यांनी जटमुक्त केले. जट काढण्याची त्यांची ही ७५ वी वेळ होती.
पुण्यातील कोंढवा परिसरात राहणाऱ्या कलावती परदेशी यांच्या डोक्यात १७ वर्षांपासून जट निर्माण झाली होती. जट डोक्यात असल्याने खूप चीड-चीड होत असायची. या जटेमुळे व्यवस्थित झोपता येत नव्हते. संबंधित महिलेला प्रचंड त्रास होत होता. त्यामुळे होणारा शारिरीक आणि मानसिक त्रास त्या कोणालाही सांगु शकत नसायच्या. मात्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी याबाबतचा गैरसमज दूर केल्यानंतर जट काढण्यास त्या तयार झाल्या. या १६ वर्षांपासूनच्या जोखडातून मुक्त झाल्याची भावना कलावती यांनी व्यक्त केली. त्यांच्या डोक्यातील ही जट तब्बल २ किलो वजनाची आणि ५ फूट लांब होती.
आजही समाजात केसातील जटेला अंधश्रद्धेच्या चष्म्यातून पाहिले जाते. या अंधश्रद्धेतून महिलांना मुक्त करण्याचे महत्वाचे काम नंदिनी जाधव करत आहेत. ७५ वी जट काढताना आणखी एका महिलेला यातून मुक्त केल्याचा आनंद असल्याचे मत अंनिसच्या कार्यकर्त्या नंदिनी यांनी व्यक्त केले. या महिलांना खुप समजावून सांगावे लागते. ही जट कापल्याने देवाचे काही संकट येईल, ही भीती महिलांना असते. मात्र त्यांना समजावून सांगत जटेचा आणि देवाचा काही संबंध नाही. आत्तापर्यंत अनेकांच्या जटा कापल्या मात्र काही बरे वाईट झाले नाही. ४ वर्षे हे काम करतोय, मात्र कुठलेही संकट आले नाही, असे अंनिसचे कार्यकर्ते समजावून सांगतात.
जट ही केसांच्या अस्वच्छतेमुळे तयार होते. जसजशी जट वाढते, तसे केस विंचरायला त्रास होतो आणि पुढे त्याला कंगवा न लावता हळदी कुंकू लावले जाते. केस धुतले तरी पूर्ण कोरडे न झाल्याने त्यात धूळ कचरा अडकतो आणि जट आणखी खराब होते. अशा अनिष्ट परंपरेतून भाबड्या महिलांना सोडवण्याचे अंनिसचे कार्य सुरूच असून मंगळवारी पुण्यातल्या साधना सेंटर येथे ही ७५ वी जट काढण्यात आली.






















Join Our Whatsapp Group