पिंपरी (Pclive7.com):- उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने पिंपळे सौदागर परिसरात “ती” च्या गणपतीची संकल्पना सुरु करण्यात आली. त्यानिमिताने परिसरातील विविध घटकातील महिलांच्या हस्ते आरतीकरण्याची प्रथा सुरु करण्यात आली. मजूर महिला, साफसफाई कर्मचारी महिला, घरकाम करणाऱ्या महिला, स्वाभिमानी विधवा, अंध, डॉक्टर, वकील, पोलीस यासह विविध क्षेत्रातील महिलांच्या हस्ते आरती करण्यात आली. दरम्यान समाजाच्या प्रवाह पासून लांब असलेल्या तृतीयपंथीयांच्या हस्ते देखील गणपतीची आरती करण्यात आली.
यावेळी उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, अर्चना भालेराव, छायावती देसले, सुवर्णा काटे, मोहिनी मेटे, हिराबाई जाधव, अश्विनी भिसे यांच्यासह परिसरातील कुंदन महिला भजनी मंडळाच्या महिला तसेच फाऊंडेशनच्या महिला सभासद व आनंद हास्य कल्बचे महिला सभासद उपस्थित होत्या. पिंपळे सौदागर परिसरात पहिल्यांदाच महिलांसाठी महिलांनी सुरु केलेला हा उपक्रम राबविला जात आहे. सर्वच स्थरातील महिलांच्या हस्ते गणपतीची आरती करून समाजातील सर्वच घटकातील महिलांना सोबत घेऊन जाण्याच्या या उपक्रमाची परिसरात चर्चा आहे. तसेच या “ती” च्या गणपतीची सातव्या दिवशी महिलांच्या सहभागानेच मिरवणूक काढली जाणार आहे, यात महिला ढोल ताशे पथक सामील होणार आहे.
याप्रसंगी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे म्हणाल्या, ज्या समाजात आपण राहातो, वावरतो, त्याच समाजाचा तृतीयपंथयांकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. मात्र हा दृष्टिकोन बदलणे काळाची गरज आहे. ते देखील आपल्या सारखीच माणसे आहेत. त्यामुळे त्यांना देखी माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळेच हा संदेश समाजापर्यंत जावा म्हणून हा वेगळा उपक्रम राबविण्यात आला असून भविष्यात समाजातील उपेक्षित घटकासाठी असे उपक्रम राबविले जाणार असल्याचे त्यांनी यानिमित्ताने सांगितले.






















Join Our Whatsapp Group