
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिजोरीवर लेखा विभागातील मुख्य अधिकारी आणि ठेकेदारांनी मिळून दरोडा टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण महाघोटाळ्याचे मुख्य सूत्रधार महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन असल्याचा गंभीर आरोप स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी पत्रकार परिषदेत केला. जैन यांनी सर्व प्रशासकीय नियम धाब्यावर बसवून ५२ कोटींहून अधिक रकमेची बिले ठेकेदारांना परस्पर अदा केली असल्याचे बारणे यांनी सांगितले.

नुकतेच सन २०२६-२७ चे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले आहे. मात्र, या अंदाजपत्रकामध्ये कोणत्याही प्रकारची तरतूद नसताना सुमारे ७० पेक्षा जास्त कामांची बिले रात्रीतून काढण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने स्थापत्य आणि पाणीपुरवठा विभागाच्या कामांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, ज्या विभागांची ही कामे होती, त्या विभागप्रमुखांना या प्रक्रियेची कोणतीही पुसटशी कल्पना नसल्याचे समोर आले आहे.

या घोटाळ्यासाठी ‘बोगस’ उपसूचनांचा आधार घेतल्याचा संशय व्यक्त होत आहे. सुमारे २० हून अधिक नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन विविध ७० कामांना मंजुरी मिळवण्यात आली. यामध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांचा समावेश आहे. संबंधित नगरसेवकांकडे विचारणा केली असता, त्यांनी आपल्या प्रभागातील कामांसाठी स्वाक्षऱ्या केल्या होत्या, मात्र या तांत्रिक प्रक्रियेबद्दल त्यांना कोणतीही माहिती नसल्याचे स्पष्ट केले.
सभापती अभिषेक बारणे यांनी या प्रकरणाला ‘थेट दरोडा’ असे संबोधले असून, प्रवीण जैन यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत त्यांचे निलंबन होत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे. आता पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी या गंभीर प्रकरणात काय पावले उचलतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
Tags: Abhishek Barne





















Join Our Whatsapp Group