मुंबई (Pclive7.com):- राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय सरकारने जाहीर केला असून, स्वतःच्या शेतजमिनीतून काढलेली माती किंवा मुरूम शेतीच्या कामांसाठी वापरल्यास त्यावर कोणतीही रॉयल्टी आकारली जाणार नाही. तसेच अशा प्रकरणांमध्ये महसूल किंवा पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गुरुवारी (२ जुलै) मावळचे आमदार सुनील शंकरराव शेळके यांनी हा महत्त्वाचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करत त्यांनी महसूल मंत्री बावनकुळे यांचे अभिनंदन केले.
यावेळी आमदार शेळके यांनी प्रश्न उपस्थित करत, शेतकरी स्वतःच्या शेतजमिनीत शेती सुधारणा किंवा अन्य शेतीविषयक कामांसाठी माती अथवा मुरूम काढत असल्यास त्यावर रॉयल्टी आकारली जाणार का आणि अशा शेतकऱ्यांवर महसूल किंवा पोलीस प्रशासनाकडून कारवाई होणार का, अशी विचारणा केली. त्यावर उत्तर देताना महसूल मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, शेतकरी स्वतःच्या शेतातील माती किंवा मुरूम त्याच शेतातील शेतीच्या कामांसाठी वापरत असल्यास कोणतीही रॉयल्टी आकारली जाणार नाही. तसेच अशा शेतकऱ्यांविरोधात कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार नाही.

या निर्णयामुळे शेततळी, बांधबंदिस्ती, शेत सपाटीकरण आणि इतर शेती सुधारणा कामांसाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अनावश्यक आर्थिक भार तसेच कारवाईची भीती दूर होणार असल्याने राज्यातील लाखो शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांचा हा महत्त्वाचा मुद्दा विधानसभेत प्रभावीपणे मांडल्याबद्दल आमदार सुनील शेळके यांच्या भूमिकेचेही विविध स्तरांतून स्वागत होत आहे.




















Join Our Whatsapp Group