पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत जे मालमत्ताधारक चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ चा मालमत्ता कर ऑनलाइन पद्धतीने भरतील, त्यांना सामान्य करावर ४ टक्के सवलत दिली जाणार आहे. ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप मालमत्ता कराचा भरणा केलेला नाही, त्यांनी तत्काळ ऑनलाइन कर भरून या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून करण्यात आले आहे.

कर आकारणी व कर संकलन विभागाने मालमत्ताधारकांना मालमत्ता कर भरणा, उपलब्ध सवलत योजना, कर भरण्याची अंतिम मुदत तसेच थकबाकीबाबतची माहिती एसएमएसद्वारे वेळोवेळी मालमत्ताधारकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. यासोबतच टेली कॉलिंगच्या माध्यमातून मालमत्ताधारकांशी थेट संपर्क साधून त्यांच्या कर भरण्याच्या स्थितीची माहिती देण्यात येत आहे. उपलब्ध सवलतींचा लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येते, व ऑनलाइन आणि प्रत्यक्ष कर भरण्याच्या सुविधांची माहितीही देण्यात येते. मालमत्ताधारकांकडून प्राप्त होणाऱ्या शंका व अडचणींची नोंद घेऊन त्यांचे संबंधित विभागामार्फत निराकरण करण्यात येते.

डेटा-आधारित संवाद प्रणालीचा अवलंब केल्यामुळे प्रत्येक मालमत्ताधारकापर्यंत आवश्यक माहिती नियोजनबद्ध पद्धतीने पोहोचविणे शक्य झाले आहे. त्याचबरोबर जनजागृती, थेट संवाद आणि माहितीचे नियमित प्रसारण यामुळे मालमत्ता कर भरण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळण्यास मदत झाली आहे. मात्र अद्यापही ज्या मालमत्ताधारकांनी कर भरला नाही, त्यांच्यासाठी आता ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन मालमत्ता कर भरल्यास सामान्य करावर ४ टक्के सवलत देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त मालमत्ताधारकांनी या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

थकबाकीदारांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु..
महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांवर जप्तीची कारवाई सुरु केली आहे. या मोहिमेअंतर्गत १८ विभागीय कार्यालयांमार्फत आतापर्यंत ३५ हजाराहून अधिक मालमत्ताधारकांना जप्तीपूर्वी नोटीस बजावण्यात आली आहे. ज्या थकबाकीदारांना नोटीस देऊनही पहिल्या तिमाहीत कर भरला नाही अशा मालमत्तांवर कारवाई करण्यास कर संकलन विभागाने सुरवात केली आहे. यामध्ये बिगर निवासी,औद्योगिक,मिश्र मालमत्ताधारकांवर थेट जप्ती करणे कारवाई करण्यात येणार तर निवासी मालमत्ता धारकांचे नळ कनेक्शन खंडित करण्यात येणार आहे.

वर्षनिहाय पहिल्या तिमाहीत ऑनलाइन कर भरणारे मालमत्ताधारक
आर्थिक वर्ष – मालमत्ताधारक
२०२०-२१ – ८८ हजार ९०
२०२१-२२ – १ लाख ११ हजार १
२०२२-२३ – १ लाख २८ हजार १५
२०२३-२४ – २ लाख ९ हजार ६२५
२०२४-२५ – २ लाख ६० हजार ७५७
२०२५-२६ – ३ लाख ३७ हजार
२०२६- २७ – ३ लाख ४७ हजार ५६४
पहिल्या तिमाहीत मोठ्या संख्येने मालमत्ताधारकांनी वेळेत मालमत्ता कर भरून सवलत योजनेचा लाभ घेतला. यासाठी सर्व करदात्यांचे मनःपूर्वक आभार. ज्यांनी अद्याप मालमत्ता कर भरलेला नाही, त्यांनी ऑनलाईन कर भरून ४ टक्के सवलतीचा लाभ घ्यावा. आपला कर हा शहराच्या विकासासाठी महत्त्वाचा वाटा आहे. चला, जबाबदार नागरिक म्हणून वेळेत कर भरून पिंपरी-चिंचवडच्या विकासात सहभागी होऊया.– रवी लांडगे, महापौर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
पिंपरी-चिंचवडकरांनी महापालिकेवर विश्वास ठेवत पहिल्या तिमाहीत ३ लाखांहून अधिक मालमत्ताधारकांनी ऑनलाईन मालमत्ता कर भरून सवलत योजनेचा लाभ घेतला. या सकारात्मक प्रतिसादाबद्दल सर्व करदात्यांचे मनःपूर्वक आभार. ज्यांनी अद्याप कर भरलेला नाही, त्यांनी ऑनलाईन मालमत्ता कर भरून ४ टक्के सवलतीचा लाभ घ्यावा. वेळेत कर भरणे म्हणजे शहराच्या विकासात थेट सहभाग नोंदविणे होय.
– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
मालमत्ता कराची थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांविरुद्ध नियमानुसार कारवाई सुरू करण्यात आली आहे. बिगर निवासी औद्योगीक, मीश्र थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करण्यात येत आहे.तसेच निवासी मालमत्तांच्या थकबाकीदारांचे नळ जोडणी खंडित करण्याची कार्यवाही केली जाणार आहे.. त्यामुळे थकबाकीदारांनी कोणतीही प्रशासकीय कारवाई टाळण्यासाठी तात्काळ मालमत्ता कराचा भरणा करून उपलब्ध सवलतीचा लाभ घ्यावा.– सचिन पवार, उपायुक्त, कर संकलन विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका.




















Join Our Whatsapp Group