पिंपरी (Pclive7.com):- संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या १९५ व्या आषाढी वारी-२०२६ पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी व्यापक नियोजन केले आहे. याच अनुषंगाने पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी शुक्रवारी आळंदी येथील पालखी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून विविध विभागांना आवश्यक सूचना दिल्या.

आळंदीतील मंदिर परिसर, पालखी मार्ग तसेच गर्दीच्या प्रमुख ठिकाणांची पाहणी करताना पोलीस प्रशासन, मंदिर संस्थान आणि स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. पालखी सोहळ्यात लाखो भाविक सहभागी होणार असल्याने वाहतूक, सुरक्षा, गर्दी नियंत्रण आणि आपत्कालीन व्यवस्थापनावर विशेष भर देण्यात आला आहे.

पोलीस आयुक्तांनी पालखी मार्गावरील अडथळे दूर करण्याच्या, रस्त्यांची दुरुस्ती करण्याच्या तसेच आवश्यक ठिकाणी बॅरिकेडिंग उभारण्याच्या सूचना दिल्या. मंदिर परिसरातील वाहनतळ व्यवस्था, भाविकांसाठी स्वतंत्र मार्ग, तसेच वाहतुकीचे नियोजन प्रभावीपणे राबविण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

सोहळ्यादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी पोलीस सहआयुक्त, अपर पोलीस आयुक्त, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, आळंदी नगर परिषदेचे पदाधिकारी आणि मंदिर संस्थानचे प्रतिनिधी उपस्थित होते. पालखी सोहळा सुरक्षित, सुरळीत आणि भक्तिमय वातावरणात पार पडावा यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले.




















Join Our Whatsapp Group