पुणे (Pclive7.com):- पुणे शहरातील पौड रोड मेट्रो स्टेशन परिसरात प्रशासनाच्या कामकाजाचा विचित्र नमुना समोर आला आहे. मुसळधार पाऊस सुरू असतानाच झाडांना टँकरद्वारे पाणी घातल्याचा प्रकार नागरिकांनी कॅमेऱ्यात कैद केला असून, त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पावसामुळे परिसरात आधीच पाणी साचलेले असतानाही टँकरमधून झाडांना पाणी दिले जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी आश्चर्य व्यक्त करत प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “जेव्हा निसर्गच झाडांना भरभरून पाणी देत आहे, तेव्हा टँकरची गरज काय?” असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे.

या घटनेनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत असून, काहींनी या प्रकाराची खिल्ली उडवली आहे. तर काही नागरिकांनी हा सरकारी निधी आणि मनुष्यबळाचा अपव्यय असल्याची टीका केली आहे.

दरम्यान, संबंधित विभागाकडून याबाबत कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मात्र, व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. नागरिकांनी या प्रकरणाची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.




















Join Our Whatsapp Group