लोणावळा (Pclive7.com):- लोणावळा-खंडाळा परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावत पर्यटनस्थळांना नवसंजीवनी दिली आहे. गेल्या ४८ तासांत तब्बल २२९ मिमी पावसाची नोंद झाल्याने परिसरातील नद्या, ओढे आणि धबधबे तुडुंब भरून वाहत आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध भुशी धरण ओव्हरफ्लो झाले असून, धरणावरून कोसळणाऱ्या पाण्याचा मनमोहक नजारा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.

सततच्या पावसामुळे लोणावळा परिसर हिरवाईने नटला असून, धुक्याची चादर, वाहणारे धबधबे आणि ओसंडून वाहणारे भुशी धरण यामुळे पर्यटकांना आकर्षित करत आहे. विशेषतः शनिवार-रविवारी पर्यटकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, धरण परिसरात पाण्याचा वेग वाढल्याने प्रशासनाने नागरिक व पर्यटकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. धरणाच्या पाण्यात उतरू नये, सेल्फी काढताना धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे तसेच पोलिस व प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पावसाच्या जोरदार आगमनामुळे लोणावळा-खंडाळा परिसरातील पर्यटन व्यवसायालाही चालना मिळाली असून, हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि स्थानिक व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.




















Join Our Whatsapp Group