पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील केजुदेवी मंदिर ते श्री मोरया गोसावी मंदिर या पवना नदीच्या परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पांढरा फेस साचत असल्याचे दिसून येत आहे. आता या प्रदूषणामुळे नदीतील मोठ्या प्रमाणात मासे मृतावस्थेत आढळून येत असून ही अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी युवा नेते ऋषिकेश वाघेरे यांनी केली आहे.

ऋषिकेश वाघेरे यांनी म्हटले आहे की, स्थानिक नागरिकांच्या मते, काही उद्योग किंवा व्यावसायिक आस्थापनांकडून कोणतीही प्रक्रिया न करता रासायनिक व सांडपाणी थेट पवना नदीत सोडले जात असल्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत असून जलचरांच्या अस्तित्वावर गंभीर परिणाम होत आहे. नदीतील मासे मृतावस्थेत आढळून येत असल्याने पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.

याशिवाय नदीकाठच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यालाही मोठा धोका निर्माण झाला असून दुर्गंधी आणि प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यापूर्वीही नदीतील फेस आणि प्रदूषणाबाबत अनेकदा तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात न आल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनल्याची टीका होत आहे.

या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि संबंधित शासकीय यंत्रणांनी तात्काळ घटनास्थळी पाहणी करून पाण्याचे नमुने तपासावेत, प्रदूषणास जबाबदार असलेल्या उद्योगांची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. पवना नदी ही पिंपरी-चिंचवड शहराची जीवनवाहिनी असून तिचे संरक्षण करणे ही प्रशासनासह प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. त्यामुळे या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षा ऋषिकेश वाघरे यांनी व्यक्त केली आहे.




















Join Our Whatsapp Group