पिंपरी (Pclive7.com):- अनुसूचित जाती (एससी) आरक्षणातील उपवर्गीकरण महाराष्ट्रात तातडीने लागू करावे, या प्रमुख मागणीसाठी पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी भव्य जनआक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या महामोर्चात मातंग, मादीगा, वाल्मिकी, ढोर तसेच इतर वंचित समाजघटकांतील अंदाजे २५ ते ३० हजार समाजबांधव सहभागी झाल्याचा दावा आयोजकांनी केला.

चिंचवड स्टेशन येथील क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून दुपारी १२ वाजता महामोर्चाला सुरुवात झाली. चिंचवड स्टेशनपासून निगडी तहसील कार्यालयाच्या दिशेने निघालेल्या या मोर्चात मार्गातील विविध भागांमधून नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत गेले. हातात मागण्यांचे फलक, घोषणाबाजी आणि सामाजिक न्यायाच्या मागण्यांसह समाजबांधवांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

सुमारे पाच तास चाललेल्या या महामोर्चाची सांगता सायंकाळी ५ वाजता निगडी तहसील कार्यालयासमोर झाली. त्यानंतर शिष्टमंडळाने तहसीलदार जयकुमार देशमुख यांची भेट घेऊन अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाची महाराष्ट्रात तातडीने अंमलबजावणी करण्याच्या मागणीचे निवेदन सादर केले.
महामोर्चात सहभागी झालेल्या समाजबांधवांनी अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्व वंचित घटकांना आरक्षणाचा न्याय्य लाभ मिळावा, यासाठी उपवर्गीकरण आवश्यक असल्याचे सांगितले. शिक्षण, रोजगार आणि राजकीय प्रतिनिधित्वाच्या संधींपासून मागे राहिलेल्या घटकांपर्यंत आरक्षणाचा लाभ प्रभावीपणे पोहोचण्यासाठी राज्य शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी सर्वोच्च न्यायालयाने १ ऑगस्ट २०२४ रोजी दिलेल्या निर्णयाचा उल्लेख करण्यात आला. या निर्णयामुळे राज्यांना अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचा मार्ग खुला झाल्याने महाराष्ट्र शासनाने आवश्यक प्रशासकीय व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याची अंमलबजावणी करावी, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.
महामोर्चास पुणे कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे, माजी मंत्री दिलीप कांबळे, माजी आमदार सुधाकर भालेराव, नगरसेविका अनुराधा गोरखे, नगरसेवक बापू घोलप, नेताजी शिंदे, मारुती जाधव, सचिन साठे, विष्णू कसबे, संजय ठोकळ, राजेश घोडे, अजिंक्य चांदणे, सुकुमार कांबळे, गणपत भिसे, रेखा बहरवाल, रावसाहेब डोंगरे, मारुती पंदरी, राजेश बडगुजर, मारुती वाडेकर, अॅड. राम चव्हाण यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि समाजनेते उपस्थित होते.

महामोर्चाच्या यशस्वितेसाठी सकल मातंग समाज पिंपरी-चिंचवड तसेच विविध सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्वयंसेवकांनी मोठे परिश्रम घेतले. मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग लाभलेल्या या आंदोलनामुळे अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मागणीचा जोरदार आवाज राज्य सरकारपर्यंत पोहोचला असून, आता शासन याबाबत कोणता निर्णय घेते याकडे समाजबांधवांचे लक्ष लागले आहे.





















Join Our Whatsapp Group