पिंपरी (Pclive7.com):- पक्षसंघटन मजबूत करण्यासोबतच जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने झोकून देऊन काम करावे, असे आवाहन शिवसेनेचे उपनेते, खासदार श्रीरंग बारणे यांनी केले.

पिंपरी-चिंचवड शहरातील संघटनात्मक बांधणी आणि आगामी कार्यक्रमांच्या नियोजनाबाबत मंगळवारी शिवसेनेची बैठक पार पडली. यावेळी माजी खासदार उमेश पाटील, उपनेते इरफान सय्यद, उपनेत्या सुलभा उबाळे, जिल्हाप्रमुख राजेश खांडभोर, शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव, गटनेते विश्वजीत बारणे, शिवसेना जिल्हा समन्वयक बाळासाहेब वाल्हेकर, शिवसेना जिल्हा संघटिका शीलाताई भोंडवे, पिंपरी-चिंचवड महानगर प्रमुख राजेश फलके, मावळ तालुकाप्रमुख राम सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सागर पाचारणे, पिंपरी-चिंचवड महिला संघटिका सरिता साने, तसेच प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले, शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये १०० टक्के ‘बीएलओ’ नियुक्तीचे काम पूर्ण झाल्याची माहिती घेतली. उर्वरित कामेही तातडीने पूर्ण करून उर्वरित पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला. पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे अहोरात्र जनतेच्या संपर्कात राहून काम करत आहेत. त्याच धर्तीवर स्थानिक पातळीवरही कार्यकर्त्यांनी थेट जनतेत जाऊन काम करण्याचे निर्देश देण्यात आले.
येणाऱ्या सणासुदीच्या दिवसांचा आधार घेत पक्षस्तरावर विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवण्यात येणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय तळागाळातील गरजू नागरिक आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्यात येणार आहे.

युवकांचे संघटन अन् महापालिकेच्या कामांवर लक्ष..
पिंपरी-चिंचवड शहरात तरुणांची मोठी ताकद असल्याने कॉलेज पातळीवर युवा सेनेच्या माध्यमातून युवकांचे संघटन मजबूत केले जाईल. तरुणांचे मेळावे घेऊन त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे.
याशिवाय, शहरातील पाणी, आरोग्य आणि रस्त्यांच्या समस्यांकडे विशेष लक्ष देऊन महापालिका प्रशासनाकडून प्रलंबित कामे करून घेण्यासाठी सनदशीर मार्गाने जनजागृती करण्याचे निर्देश कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत. संघटनात्मक बांधणी आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून संघटन बळकट केले जाणार असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.




















Join Our Whatsapp Group