मावळ (Pclive7.com):- पवित्र श्रावणी सोमवारच्या शुभमुहूर्तावर मावळ तालुक्यातील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री कोंडेश्वर देवस्थान येथे आमदार सुनील शेळके यांनी भेट देऊन श्री कोंडेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून भाविक व पर्यटकांसाठी आवश्यक असलेल्या सोयी-सुविधांचा आढावा घेण्यात आला. मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी, स्थानिक ग्रामस्थ तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून परिसरातील विविध प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना आमदार शेळके यांनी दिल्या.

मावळ तालुका हा पुणे आणि मुंबईसह राज्यभरातील पर्यटकांसाठी महत्त्वाचे पर्यटन केंद्र म्हणून ओळखला जातो. लोणावळा, खंडाळा, भुशी धरण, पवना धरण यांसारख्या पर्यटनस्थळांसोबतच मावळातील विविध धार्मिक आणि निसर्गरम्य ठिकाणांनाही पर्यटक व भाविक मोठ्या संख्येने भेट देतात. त्यामध्ये श्री कोंडेश्वर देवस्थान हे धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे आणि निसर्गरम्य परिसरात वसलेले प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.
विशेषतः पावसाळ्यात आणि श्रावण महिन्यात कोंडेश्वर परिसरात भाविक व पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर परिसरातील उपलब्ध सुविधांची पाहणी करताना योग्य पार्किंग व्यवस्था, स्वच्छतागृह, भाविक व पर्यटकांसाठी निवारा शेड, पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सीमाभिंत आदी सुविधांची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले.

या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार सुनील शेळके यांनी दिल्या. तसेच वनविभागाच्या अखत्यारीतील जागा व कामांसाठी आवश्यक असलेल्या परवानग्या तातडीने मिळवून विकासकामांचा मार्ग मोकळा करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आल्या.
कोंडेश्वर परिसराला धार्मिक महत्त्वासोबतच पावसाळ्यातील निसर्गसौंदर्याची मोठी देणगी लाभली आहे. परिसरातील धबधबे, हिरवाई आणि निसर्गरम्य वातावरणामुळे पावसाळ्यात येथे पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे धार्मिक पर्यटनासोबतच निसर्ग पर्यटनालाही चालना मिळत असून, त्यातून स्थानिक नागरिकांच्या रोजगार आणि व्यवसायाच्या संधी वाढण्यास मदत होत आहे.

मात्र, वाढत्या पर्यटकसंख्येच्या पार्श्वभूमीवर परिसरात सुरक्षितता, स्वच्छता, वाहतूक आणि मूलभूत सुविधांचे नियोजन करणे आवश्यक आहे. भाविक व पर्यटकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, तसेच मंदिर परिसर सुरक्षित आणि सुसज्ज राहावा, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यावर आमदार सुनील शेळके यांनी भर दिला.
मावळच्या पर्यटनविकासाला चालना देताना केवळ लोणावळा किंवा भुशी धरणापुरते पर्यटन मर्यादित न ठेवता तालुक्यातील धार्मिक, ऐतिहासिक आणि निसर्गरम्य स्थळांचा सर्वांगीण विकास करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने कोंडेश्वरसारख्या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राकडे विशेष लक्ष देऊन भाविक आणि पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने हा पाहणी दौरा महत्त्वपूर्ण ठरला आहे. मावळातील पर्यटन वाढीसोबतच स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि पर्यटकांना सुरक्षित, स्वच्छ व दर्जेदार सुविधा मिळाव्यात, यासाठी कोंडेश्वर परिसराचा नियोजनबद्ध विकास करण्यास आमदार सुनील शेळके यांनी प्राधान्य दिले आहे.





















Join Our Whatsapp Group