पिंपरी (Pclive7.com):- बालेवाडी-म्हाळुंगे परिसरातील खराब रस्ते आणि खड्ड्यांमुळे आणखी एका निष्पाप जीवाला आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सायंकाळी घडली. महाळुंगे येथील ग्रीन कोर्ट सोसायटीसमोरील दुर्गा कॅफेजवळ झालेल्या भीषण अपघातात ११ वर्षीय चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वडील आपल्या मुलगा आणि मुलीसह दुचाकीवरून ट्यूशनला जात होते. यावेळी रस्त्यावरील खड्ड्यामुळे दुचाकी घसरल्याने तिघेही रस्त्यावर पडले. दुर्दैवाने, मागे बसलेला ११ वर्षीय मुलगा रस्त्यावर कोसळून मागून येणाऱ्या आयशर ट्रकच्या चाकाखाली आला. ट्रकखाली आल्याने मुलाचा जागीच मृत्यू झाला.

हा अपघात सोमवारी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास घडला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी बालेवाडी-म्हाळुंगे परिसरातील खराब रस्ते, मोठमोठे खड्डे आणि अपुऱ्या सुरक्षा उपाययोजनांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

या दुर्घटनेनंतर संबंधित रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, धोकादायक ठिकाणी योग्य सुरक्षा उपाययोजना कराव्यात तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.




















Join Our Whatsapp Group