पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व १० प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी भाजपाच्या नगरसदस्यांची निवड झाली आहे. आता १३ जुलै रोजी या निवडणूक निकालाची औपचारिक घोषणा होईल, अशी माहिती महानगरपालिका सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी दिली.

प्रभाग समिती अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज स्वीकारण्याची मुदत आज दुपारी ३ ते सायंकाळी ५ ही होती. या काळात प्रत्येक प्रभागात १ याप्रमाणे भाजपकडून एकूण १० नगरसदस्यांनी अर्ज केले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षाच्या एकाही नगरसदस्याने उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे सर्व प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी भाजप नगरसदस्यांची निवड निश्चित झाली आहे.

यामध्ये प्रभाग अ (राजगड) समिती अध्यक्षपदी अर्चना करांडे यांची, प्रभाग ब (सिंहगड) समिती अध्यक्षपदी मंदार देशपांडे, प्रभाग क (विजयदुर्ग) समिती अध्यक्षपदी निखिल बोऱ्हाडे, प्रभाग ड (देवगिरी) समिती अध्यक्षपदी सविता खुळे, प्रभाग इ (शिवनेरी) समिती अध्यक्षपदी अर्चना सस्ते, प्रभाग फ (तोरणा) समिती अध्यक्षपदी शिवानी नरळे, प्रभाग ग (पुरंदर) समिती अध्यक्षपदी मनिषा पवार, प्रभाग ह (प्रतापगड) समिती अध्यक्षपदी तृप्ती कांबळे, प्रभाग ज (रायगड) समिती अध्यक्षपदी आरती चोंधे आणि प्रभाग ल (लोहगड) समिती अध्यक्षपदी रेखा देवकर यांची निवड निश्चित झाली आहे, असे देखील पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी सांगितले.




















Join Our Whatsapp Group