– बाळासाहेब जवळकर –
पिंपरी (Pclive7.com):- एका संततधार पावसाने.. पिंपरी-चिंचवडच्या स्वंयघोषित ‘स्मार्ट सिटी’चा मुखवटा क्षणार्धात फाडून टाकला. अब्जावधी रूपये खर्च करून झालेल्या कथित विकासाचे दावे पाण्यात वाहून गेले. रस्ते, उड्डाणपूल, भुयारी मार्ग, वीजपुरवठा, पाणीपुरवठा, वाहतूक, स्वच्छता…अशा सर्वच व्यवस्था एकामागोमाग एक कोलमडून पडल्या. अनेक वर्षांपासून दिवसाढवळ्या, संगनमताने सुरू असलेले नदी बुजवण्याचे अक्षम्य पाप किती महागात पडू शकते आणि लाखो शहरवासीयांचा जीव कशाप्रकारे धोक्यात आणू शकते, याची झलक या पावसाने दिली. नद्यांप्रमाणेच ओढे, नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह बंद करणे, ते बुजवणे, त्यावर बांधकामे करणे, सांडपाणी निचरा व्यवस्थेचा अभाव, रस्त्यांची अत्यंत निकृष्ट दर्जाची कामे आणि पालिका लुटणाऱ्यांचा अनागोंदी कारभार…या पावसामुळे एकदम उघड झाला.

पिंपरी-चिंचवड हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर होणार, अशी सातत्याने गर्जना करणाऱ्या महापालिकेच्या कारभाराची खरी लायकी या एकाच पावसामुळे दिसून आली. विकासाच्या फसव्या घोषणांचे बिंग फुटले. प्रशासकीय यंत्रणेच्या सगळ्या मर्यादा स्पष्ट झाल्या. उड्डाणपूल, ग्रेडसेपरेटर, भुयारी मार्गातील वाहतूक बंद करावी लागली. शहरभरात वाहतुकीचे तीन तेरा वाजले. ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली. महावितरणच्या नाकर्तेपणामुळे विजेचा खेळखंडोबा झाला. शहरभरात अंधाराचे साम्राज्य पसरले.
सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, रहाटणी, काळेवाडी, रावेत, किवळे, मामुर्डी, हिंजवडी, वाकड, पुनावळे, ताथवडे, निगडी, चिंचवडगाव, पिंपरीगाव, संत तुकारामनगर, वल्लभनगर, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी, भोसरी, चिखली… शहरातील जवळपास सगळ्याचं भागात पावसाचा जोरदार फटका बसला. शहराचा असा ठरावीक भाग राहिला असेल, जिथे पावसामुळे दैना उडाली नसेल.
शहरभरात रस्त्यांवर पाणी साचले होते. सखल भागातील घरांमध्ये, बंगल्यांमध्ये पाणी शिरले. दुकानांमध्ये, चाळीत, सोसायट्यांमध्ये पाणी घुसले. सगळीकडे चिखल तयार झाला. रस्त्यांवरून पायी चालणे अशक्य झाले होते. हजारो लोकं घरांमध्ये अडकून पडले. तितक्याच लोकांना तात्पुरत्या निवारा केंद्रात स्थलांतरित करावे लागले. कोट्यवधी रूपये खर्च करून बांधलेल्या निकृष्ट रस्त्यांची चाळण झाली. डांबर वाहून गेले. सिमेंट रस्तेही उखडले. त्यावरही मोठं-मोठे खड्डे पडले. असा एकही रस्ता राहिला नाही, ज्यावर खड्डे पडले नाहीत. परिणामी, सर्व रस्ते ठप्प झाले. जागोजागी वाहतुकीचा कोंडमारा झाला. हजारो वाहनस्वारांना तीव्र मनस्ताप सहन करावा लागला.

हे कमी होते म्हणून की काय, संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. पावसाचे कारण देऊन महापालिकेच्या नियोजनशून्य पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी हात वर केले. आधीच पाणीपुरवठा विस्कळीत होता. कपातीमुळे पाणी उपलब्ध नव्हते. त्यात पुन्हा पिण्याचे पाणी नाही. अशावेळी नागरिकांची, गृहिणींची काय अवस्था झाली असेल. पाऊस सुरू झाल्यानंतर वीजपुरवठा खंडीत होतो, त्याचा थेट परिणाम पाणीपुरवठ्यावर होतो. हे जणू कायमचे सूत्र ठरलेले आहे. याची सर्वांना माहिती असूनही पालिका अधिकाऱ्यांनी ना समन्वय ठेवला, ना खबरदारी घेतली, ना पर्यायी व्यवस्था करून ठेवली. महावितरणच्या गलथानपणावरून हजारो नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. खंडीत वीजपुरवठा सुरूच होत नसल्याने रावेतमधील रहिवाशांचा उद्रेक झाला, तो प्रातिनिधीक होता. वीजपुरवठ्याअभावी हवालदिल झालेली स्थिती इतरही गावांमध्ये होती.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी आपत्तीच्या सर्व शक्यता गृहीत धरून पालिकेतर्फे खबरदारीच्या उपाययोजना केल्या जातात. तासनतास आढावा बैठका चालतात.
प्रत्यक्षात, त्याचा काडीचाही उपयोग झाला नाही. ते सारे कामचलाऊ होते, दिखावू होते. म्हणूनच या बोगस नियोजनाचा फज्जा उडाला. ‘एसी’मध्ये बसून कागदी घोडे नाचवणारी, पेपरबाजी करणारी पालिकेची यंत्रणा कोलमडून पडली. आपत्कालीन परिस्थितीत संपर्कासाठी पालिकेने जाहीर केलेले अधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक काहीही उपयोगाचे नव्हते. बहुतांश अधिकारी फोनच उचलत नव्हते. म्हणून कित्येकांनी थेट आयुक्तांना फोन करून आपबीती सांगितली. त्यांच्या आदेशानंतरही फारसे काही घडत नव्हते.
त्या-त्या भागातील संस्था, मंडळे, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले, त्यांनी शक्य ती मदत केली. म्हणून वेळ निभावून नेता आली. पूरग्रस्त फक्त महापालिकेवर कागदी नियोजनावर विसंबून राहिले असते तर भीषण परिस्थितीला तोंड द्यावे लागले असते.

शहरावर ओढावलेल्या या संकटकाळाची झळ बसलेल्या नागरिकांचे अनुभव ऐकल्यानंतर पिंपरी पालिकेकडे आपत्ती व्यवस्थापन नावाची व्यवस्था अस्तित्वात आहे का, असा प्रश्न पडतो. दुर्देवाने भविष्यात असा बाका प्रसंग पुन्हा उद्भभवलाच, तर सगळे काही ‘रामभरोसे’ असेल, हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज पडणार नाही.
‘स्मार्ट सिटी’अंतर्गत सर्वाधिक गाजावाजा पिंपळे गुरवच्या विकासकामांचा केला जातो. या पावसात तिथल्या सगळ्या विकासाचा फुगा फुटला. निकृष्ट दर्जाच्या, अर्धवट स्वरूपाच्या कामांचे बिंग फुटले. पिंपळे गुरवमध्ये गल्लीबोळात पाणी शिरले होते. पाण्याचे रौद्र रूप येथील रहिवाशांनी अनुभवले. लगतच्या सांगवी, पिंपळे सौदागरसह शहरभरात जवळपास अशीच परिस्थिती होती. पावसाच्या हाहाकारामुळे संपूर्ण पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या दर्जाहीन कामांची पोलखोल झाली.
पिंपरी-चिंचवड शहर जलमय होण्याचे खरे कारण काय, याचा उलगडा होण्याची गरज आहे. तसा खुलासा महापालिकेने केला पाहिजे. मात्र, एवढी पारदर्शकता अशक्य असल्याने तसे कोणी करणार नाही. पवना असो की इंद्रायणी नदी. भराव टाकून नद्यांचे पात्र बुजवण्यात आल्याचा सर्वाधिक फटका शहरवासीयांना बसला, त्यामुळे प्रचंड हाल सहन करावे लागले.
दापोडी, पिंपळे गुरव पासून रावेतपर्यंत नदीत भराव टाकून, नंतर सपाटीकरण करून, नव्याने भूखंड तयार करण्यात आलेत. त्या भूखंडांवर प्रचंड बेकायदा बांधकामे झाली आहेत. पूररेषांचे उल्लंघन तर झालेच आहे, नदीपात्र अरूंद झाले आहे. पुराच्या पाण्याचा धोका होताच. मोठा पाऊस पडल्यास नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरणार आणि हजारो कुटुंबियांची वाताहात होणार, हे उघडपणे दिसत असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. शहरात ठिकठिकाणी ओढे, नाले बुजवण्यात आले. काही ठिकाणी नाल्यांचे प्रवाह बंद करण्यात आले. काही ठिकाणी ते वळवण्यात आले. नाल्यांवर बेकायदा बांधकामे झाली. त्या ठिकाणी राजरोसपणे खरेदी-विक्रीचा धंदा सुरू झाला.
नद्या बुजवून, ओढे, नाले गिळंकृत करून आणि पर्यावरणाच्या नावाखाली अब्जावधी रूपये कमवून, ते पचवून राजरोस मिरवणाऱ्यांना जाब विचारणारे कोणी नाही. पावसामुळे शहर पाण्यात बुडाले, शहरवासीयांना ज्या यातना भोगाव्या लागल्या, त्यास जे करंटे जबाबदार आहेत, त्यांना कारवाईची भीती नाही. आर्थिक देवाण-घेवाण आणि दबावतंत्रामुळे कारवाई होत नाही. त्यामुळे सगळेच मोकाट सुटले आहेत. मुठभरांच्या दलालीसाठी, त्यांच्या कमाईच्या हव्यासापायी लाखो शहरवासीयांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
एकाच पावसात निर्माण झालेली पूरस्थिती हा निसर्गाचा त्यादृष्टीने थेट इशाराच आहे. हा पूर केवळ पावसाचा नव्हता, तो विकासाच्या नावाखाली निसर्गावर झालेल्या अन्यायाचा होता. अनेक वर्षांच्या भ्रष्ट कारभाराचा, ‘थर्ड क्लास’ नियोजनाचा, बेजबाबदारपणाचा, पर्यावरणाच्या निर्घूण हत्येचा तो एकत्रित परिणाम होता. हे असेच सुरू राहिले तर कदाचित भविष्यातील पूरपरिस्थिती मानवी जीविताची मोठी हानी करणारी असू शकते. महापालिकेचा एकूण कारभार पाहता तो अभद्र दिवस कधीही येऊ शकतो, त्याआधीच सर्वांनी जागे झाले पाहिजे.
निसर्गाची वक्रदृष्टी झाल्यानंतर काय होते, हे दर्शवणारी पुणे जिल्ह्याच्या आंबेगावातील माळीणची दुर्घटना अजूनही सर्वांच्या स्मरणात आहे. संपूर्ण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. सध्या पिंपरी-चिंचवडमध्ये पर्यावरणाची ज्या पध्दतीने वाट लावण्याचे काम सध्या सुरू आहे, ते पाहता भविष्यात पिंपरी-चिंचवडचे ‘माळीण’ होण्याची शक्यता कोणी ठामपणे नाकारू शकेल का ? किंबहुणा, त्या दिशेनेच शहराची वाटचाल सुरू आहे की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.





















Join Our Whatsapp Group