पिंपरी (Pclive7.com):- माहिती अधिकार कार्यकर्ते रमेश नानासाहेब वाघेरे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन देत मोशी कचरा डेपो तात्काळ बंद करून पुनावळे कचरा डेपो कार्यान्वित करण्याची मागणी केली आहे.

रमेश वाघेरे यांनी निवेदनात म्हटले आहे की, १९८२ पासून सुरू असलेल्या मोशी कचरा डेपोची क्षमता अनेक वर्षांपूर्वीच संपली असून, त्यानंतरही डेपो सुरू ठेवल्यामुळेच अलीकडील दुर्घटना घडली आणि निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला. पुनावळे कचरा डेपोचे आरक्षण १९९७ पासून अस्तित्वात असून, त्यासाठी शासनाकडे निधीही जमा करण्यात आला होता. मात्र राजकीय विरोध आणि इतर कारणांमुळे तो प्रकल्प रखडल्याचा आरोप त्यांनी केला.

वाघेरे यांनी पुनावळे कचरा डेपोला विरोध करणारे लोकप्रतिनिधी, तसेच भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यावरही गंभीर आरोप करत, मोशी दुर्घटनेसाठी त्यांचीही जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी केली आहे. तसेच पुनावळे डेपोला विरोध करणाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी निवेदनातून केली आहे.





















Join Our Whatsapp Group