पिंपरी (Pclive7.com):- आकुर्डीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आकुर्डी परिसरात एका ऑटो रिक्षाचालकाने स्वतःच्या रिक्षामध्ये गळफास घेऊन जीवन संपवले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीचे नाव प्रमोद साळुंखे (वय अंदाजे ३२ वर्षे) असे असून ते चाकण येथील आंबेठाण परिसरातील रहिवासी असल्याचे समजते.

आकुर्डी येथील सुखवानी हेरिटेज बिल्डिंगसमोर उभी असलेल्या एका ऑटो रिक्षामध्ये प्रमोद साळुंखे यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. ही घटना काल मध्यरात्री घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सकाळी परिसरातील नागरिकांना संशयास्पद स्थितीत रिक्षा दिसल्यानंतर त्यांनी तातडीने निगडी पोलिसांना माहिती दिली.

निगडी पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. प्राथमिक तपासात प्रमोद साळुंखे यांनी स्वतःच्या शर्टाचा वापर करून रिक्षाच्या आत गळफास घेतल्याचे समोर आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. कौटुंबिक कलह, आर्थिक अडचण किंवा इतर कोणत्या मानसिक तणावामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, याचा सखोल तपास निगडी पोलिस करत आहेत. पोलिस उपनिरीक्षकांच्या नेतृत्वाखालील टीमने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.





















Join Our Whatsapp Group