
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण १०० टक्के भरले असून अद्याप पावसाळ्याचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना दररोज, मुबलक व जास्त दाबाने नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पवना धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असताना नागरिकांना एकाआड एक दिवस पाणीपुरवठा करण्याची आवश्यकता राहिलेली नाही. शहरातील अनेक भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः उंच भागांमध्ये आणि शेवटच्या टोकावरील परिसरांमध्ये पाणी व्यवस्थित पोहोचत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर त्यांनी महापालिका प्रशासनाकडे चार प्रमुख मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये पावसाळा संपेपर्यंत संपूर्ण शहरात दररोज पाणीपुरवठा करणे, सर्व भागांत जास्त दाबाने व मुबलक पाणी देणे, नागरिकांना पुरेसा वेळ पाणी उपलब्ध करून देणे आणि कमी दाबाने पाणी मिळणाऱ्या भागांत तातडीने तांत्रिक उपाययोजना करून पुरेसा पाणीदाब उपलब्ध करून देणे यांचा समावेश आहे.
पाणी हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असून धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असताना शहरवासीयांना नियमित व पुरेशा प्रमाणात पाणी मिळणे आवश्यक असल्याचे नगरसेविका ऐश्वर्या तरस यांनी निवेदनात नमूद केले आहे. तसेच या मागणीचा सकारात्मक विचार करून प्रशासनाने तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.




















Join Our Whatsapp Group