पंढरपूर (Pclive7.com):- अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल-रूक्मिणीची आषाढी एकादशीची शासकीय महापूजा आज (दि.२५) पहाटे अडीच वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते भक्तीभावाने व उत्साहाने संपन्न झाली. यावेळी मानाचा वारकरी म्हणून उपस्थित राहण्याचा मान बाळासाहेब माधव माने व त्यांच्या पत्नी प्रभावती बाळासाहेब माने (रा. गौरगांव, ता. कळंब जि. धाराशिव) या शेतकरी दाम्पत्याला मिळाला.

बाळासाहेब माने (वय ७०) हे शेतकरी असून ते गेल्या २० वर्षांपासून आळंदी-पंढरपूर पायी वारी करतात. यंदा ते आपल्या पत्नीसोबत वारीला आले आहेत. मध्यरात्री १२ वाजता दर्शन रांग बंद करण्यात आली, तेव्हा रांगेत प्रथम असलेल्या बाळासाहेब माने यांची निवड समितीने मानाचा वारकरी म्हणून निवड केली.
आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी दुपारीच पंढरपुरात दाखल झाले होते. आज पहाटे दोन वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पत्नी अमृता फडणवीस व इतर कुटुंबीय मंदिरात पोहचले. अडीच वाजता त्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. त्यानंतर माता रुक्मिणीची महापूजा संपन्न झाली.

यावर्षी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना सहाव्यांदा विठ्ठल रुक्मिणीची आषाढीची शासकीय महापूजा करण्याची संधी मिळाली आहे. त्यापूर्वी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते विठ्ठलाची नित्य पूजा संपन्न झाली. रूक्मिणी मातेची पूजा शिवाजी महाराज मोरे यांच्या हस्ते तर पाद्य पूजा मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते करण्यात आली.
महापूजेवेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, त्यांच्या पत्नी सोनिया गोरे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आदी उपस्थित होते. यावर्षी आषाढी यात्रेसाठी देशभरातून सुमारे तीस लाखाहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. पंढरी नगरी विठुरायाच्या जयघोषाने व टाळ मृदंगाच्या गजराने दुमदुमून गेली आहे. सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत.




















Join Our Whatsapp Group