पिंपरी (Pclive7.com):- शहरातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे भव्य पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी ‘रोजगार महाकुंभ’ आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत होणाऱ्या या महाकुंभात विविध क्षेत्रांतील नामांकित कंपन्या सहभागी होणार असून हजारो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

हा उपक्रम आमदार उमा खापरे यांच्या विशेष पुढाकाराने तसेच भाजप युवा मोर्चाचे माजी प्रदेशाधक्ष अनुप मोरे, माजी उपमहापौर तथा नगरसेवक तुषार हिंगे आणि जयदीप खापरे यांच्या माध्यमातून व ‘युवा हब स्किल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे. विविध सामाजिक संस्थांचेही या उपक्रमाला सहकार्य लाभले आहे. कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

नामांकित कंपन्यांचा सहभाग..
महाकुंभामध्ये बँकिंग, आयटी, बीपीओ, केपीओ, मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमोबाईल, रिअल इस्टेट आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्या सहभागी होणार आहेत. Axis Bank, ICICI Bank, Tata Motors, Hudas Technology, Wiggle Space, Bajaj आणि Hyundai यांसारख्या प्रतिष्ठित कंपन्यांचे प्रतिनिधी उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत.
५ वी पास ते पदवीधरांसाठी संधी..
या रोजगार मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे ५ वी पास, १० वी, १२ वी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर, इंजिनिअरिंग तसेच इतर पात्र उमेदवारांसाठी त्यांच्या शैक्षणिक पात्रता आणि कौशल्यानुसार नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

‘जॉब कार्ड’ उपक्रम ठरणार विशेष आकर्षण
महाकुंभात सहभागी होऊनही तात्काळ नोकरी न मिळालेल्या उमेदवारांसाठी विशेष ‘जॉब कार्ड’ योजना राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, कौशल्ये आणि रोजगाराची गरज यांची माहिती संकलित करून भविष्यातील रोजगाराच्या संधींशी त्यांना जोडले जाणार आहे.
आयोजकांचे आवाहन..
“प्रत्येक हाताला काम आणि प्रत्येक कुटुंबाला रोजगार व स्वयंरोजगाराची संधी” हा या महाकुंभाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. रोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींनी आपली आवश्यक कागदपत्रे आणि अद्ययावत बायोडाटा (Resume) सोबत घेऊन २९ सप्टेंबर रोजी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन अनुप मोरे, तुषार हिंगे आणि जयदीप खापरे यांनी केले आहे.

















Join Our Whatsapp Group