पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील कर्मचारी विजय कोळी यांनी सरकारी पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या कोळी यांचा मृतदेह आज सकाळी निगडी ट्रान्सपोर्ट नगर येथील बस डेपो परिसरात आढळून आला.

मिळालेल्या माहितीनुसार, विजय कोळी हे पिंपरी-चिंचवड पोलिस दलात कार्यरत होते. कौटुंबिक वादातून ते दोन दिवसांपूर्वी घरातून निघून गेले होते. घरातून बाहेर पडताना त्यांनी शासकीय पिस्तूल सोबत घेतल्याने पोलिस दलाने त्यांचा शोध सुरू केला होता.

कोळी यांचे शेवटचे लोकेशन निगडीतील दुर्गादेवी टेकडी परिसरात आढळून आल्याने त्या भागात मोठ्या प्रमाणात शोधमोहीम राबविण्यात आली. ड्रोनच्या साहाय्यानेही परिसराची तपासणी करण्यात आली होती. मात्र, त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागत नव्हता.

आज सकाळी निगडी ट्रान्सपोर्ट नगर येथील बस डेपो परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासात त्यांनी शासकीय पिस्तुलातून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. विजय कोळी हे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे RTPC म्हणून कार्यरत होते. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड पोलिस दलात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, पोलिस पुढील तपास करीत आहेत.


















Join Our Whatsapp Group