पिंपरी (Pclive7.com):- गणेशोत्सवादरम्यान ध्वनीप्रदूषण करणाऱ्यांविरोधात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. 14 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर 2026 या कालावधीत शहरात ध्वनीप्रदूषणासंदर्भात एकूण 91 गुन्हे दाखल करण्यात आले असून, 86 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, परिमंडळ 1 मध्ये सर्वाधिक 29 गुन्हे दाखल झाले असून 28 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. परिमंडळ 2 मध्ये 44 गुन्हे दाखल करण्यात आले असून सर्व 44 प्रकरणांमध्ये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. परिमंडळ 3 मध्ये 8 गुन्हे दाखल करून 8 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर परिमंडळ 4 मध्ये 10 गुन्हे दाखल झाले असून 6 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

परिमंडळनिहाय कारवाईमध्ये निगडी, चिंचवड, पिंपरी, सांगवी, संत तुकारामनगर, दापोडी, बावधन, काळेवाडी, हिंजवडी, वाकड, भोसरी, चाकण दक्षिण, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, दक्षिण महाळुंगे एमआयडीसी आणि शिरगाव पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील प्रकरणांचा समावेश आहे.

गणेशोत्सव काळात ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे उत्सवाच्या काळात ध्वनिक्षेपक आणि इतर ध्वनीवर्धक साधनांच्या वापरावर पोलिसांचे लक्ष असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एकूण : ९१ गुन्हे, डीजे स्पीकर वाहने असे एकूण ८६ मुद्देमाल जप्त


















Join Our Whatsapp Group