पिंपरी (Pclive7.com):- भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या Developing Innovation Culture and Entrepreneurship (DICE) in Schools या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका संचालित पीएम श्री माध्यमिक विद्यालय, थेरगाव यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातून निवड झालेल्या केवळ १० शाळांमध्ये या विद्यालयाचा समावेश असल्याने महानगरपालिका शिक्षण विभागासाठी ही अभिमानास्पद बाब ठरली आहे. DICE उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये नवोपक्रम, सर्जनशील विचार, समस्या सोडविण्याची क्षमता, डिझाईन थिंकिंग, उद्योजकता आणि प्रोटोटाइप निर्मिती यांसारखी कौशल्ये विकसित करणे हा आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरातील समस्या ओळखून त्यावर नाविन्यपूर्ण उपाय शोधण्याची तसेच त्या कल्पनांचे प्रत्यक्ष नमुने (Prototype) विकसित करण्याची संधी मिळणार आहे.

या उपक्रमासाठी JSPM कॉलेज, वाकड हे उच्च शिक्षण संस्थेचे (HEI) तांत्रिक व मार्गदर्शक सहकार्य विद्यालयाला मिळणार आहे. प्रा. श्रीमती दीपाली मगदूम या उपक्रमाच्या समन्वयक म्हणून काम पाहणार असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या कल्पनांना आकार देणे, प्रोटोटाइप विकसित करणे आणि नवोपक्रमाच्या पुढील टप्प्यांसाठी आवश्यक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.

DICE अंतर्गत विद्यालयात उद्योजकीय कौशल्य विकास, क्षेत्रभेटी, कल्पना निर्मिती कार्यशाळा, Proof of Concept आणि Prototype विकास, Startup Ecosystem व Intellectual Property Rights (IPR) संदर्भातील मार्गदर्शन तसेच Demo Day आणि प्रदर्शनांचे आयोजन करण्यात येणार आहे.
विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबासाहेब राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक, विद्यार्थी आणि JSPM कॉलेज वाकड यांच्या सहकार्याने या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या निवडीमुळे थेरगाव परिसरातील विद्यार्थ्यांना “समस्या ओळखा, कल्पना सुचवा, नवोपक्रम करा आणि प्रोटोटाइप तयार करा” या संकल्पनेनुसार काम करण्यासाठी एक भक्कम व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

दरम्यान, प्रा. श्रीमती दीपाली मगदूम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यालयाला भेट देऊन उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा केली.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या School Innovation Council मध्ये विद्यालयाची निवड झाल्याबद्दल पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या उपायुक्त श्रीमती ममता शिंदे आणि शिक्षणाधिकारी श्रीमती संगीता बांगर यांनी आनंद व्यक्त करत मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
“राष्ट्रीय स्तरावरील School Innovation Council साठी पीएम श्री माध्यमिक विद्यालय थेरगावची निवड होणे ही महानगरपालिका शिक्षण विभागासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. JSPM कॉलेजच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांमधील नवोपक्रम, कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलतेला निश्चितच चालना मिळेल.”– श्रीमती ममता शिंदे, उपायुक्त, शिक्षण विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका


















Join Our Whatsapp Group