पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट-३ ने उल्लेखनीय कामगिरी करत सतत दहा दिवस पाठपुरावा करून आणि सुमारे १०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून चैन स्नॅचिंग व दुचाकी चोरीच्या दोन गुन्ह्यांचा छडा लावला आहे. या कारवाईत एमपीडीए अंतर्गत नोंद असलेल्या आरोपीसह दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून सोन्याचे मंगळसूत्र आणि चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या सूचनेनुसार एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चैन स्नॅचिंग प्रकरणाचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट-३ कडून सुरू होता. तपासादरम्यान पोलिसांनी विविध ठिकाणांवरील सुमारे १०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून संशयितांचा माग काढला.

दि.२३ सप्टेंबर रोजी गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की, चैन स्नॅचिंग प्रकरणातील तीन संशयित मोशीतील आदर्शनगर परिसरात फिरत आहेत. त्यानुसार पोलिसांनी संघर्ष कॉलनी, आदर्शनगर येथे सापळा रचून इंदर अनिल राजपूत (वय २२), महेश कान्हा राजपूत (वय २६) आणि एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपींनी मोशीतील सेक्टर-४, प्राधिकरण परिसरात एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावल्याची तसेच पुरंदर तालुक्यातील कोळविहरे येथून होंडा युनिकॉर्न दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून सोन्याचे मंगळसूत्र आणि चोरीची दुचाकी जप्त केली आहे.

या कारवाईमुळे एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील चैन स्नॅचिंगचा गुन्हा तसेच जेजुरी पोलीस ठाण्यातील दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. अटक आरोपींवर यापूर्वीही दिघी, एमआयडीसी भोसरी, चाकण आणि वाकड पोलीस ठाण्यांत विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट-३ संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनिल जावळे, पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी, पोलीस अंमलदार बाबासाहेब गर्जे, सोमनाथ बोन्हाडे, अजित रुपनवर, बाळासाहेब भांगले, सुंदर थोरात, तुषार वराडे, दिलीप राठोड, स्वप्निल महाले, शशिकांत नांगरे, सचिन गोनटे यांनी केली आहे.

















Join Our Whatsapp Group