पिंपरी (Pclive7.com):- उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावत चार महिन्यांपासून फरार असलेल्या चार आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेले सुमारे १४ तोळे सोन्याचे दागिने बिहार येथून जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी निक्कुकुमार देवकी सिंह (वय २२, बिहार), रंजनकुमार देवकी सिंग (वय २०, बिहार), राजकुमार उर्फ प्रिन्सकुमार विजय पासवान (वय १९, बिहार), डिंपल पटेल विनोद सिंह (वय २५, बिहार) या आरोपींना अटक केली आहे

मौजे महाळुंगे इंगळे (ता. खेड) येथील रहिवासी कविता मदन कड यांच्या बंद घराचा शटर व कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला होता. घरातील कपाटातील सोन्याचे दागिने चोरी करून आरोपी पसार झाले होते. याप्रकरणी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही कॅमेरे, तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला. तपासादरम्यान आरोपी बिहार राज्यात लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या विशेष पथकाने बिहारमध्ये जाऊन कारवाई केली. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरीस गेलेले १२ लाख ६० हजार रुपये किमतीचे १४ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
सदरची कारवाई उत्तर महाळंगे पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सुर्यवंशी, सहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे, पोलीस अंमलदार राज कोणकेरी, अमोल बोराटे, विठ्ठल वडेकर, संतोष काळे, गणेश गायकवाड, संतोष वायकर, मंगेश कदम, हरी रणदिवे, मंगेश घोलप, साहिल सांडभोर, समीर महात तसेच मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ४ यांचे कार्यालया कडील सहा. फौजदार तुकाराम घुगे यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे हे करत आहेत.




















Join Our Whatsapp Group