वाकड (Pclive7.com) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने सांगवी उपविभागातील वाकड व पिंपळे निलख शाखेतील कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात नगरसेविका स्नेहा रणजित कलाटे यांच्या हस्ते रेनकोट वितरण करण्यात आले.

पावसाळ्यात अखंडित वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ऊन, वारा आणि मुसळधार पावसाची पर्वा न करता नागरिकांच्या सेवेसाठी दिवस-रात्र कार्यरत असलेल्या महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना या उपक्रमातून मदतीचा हात देण्यात आला. यावेळी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता कल्याण गिरी, सहाय्यक अभियंता सुरेश गवारी (वाकड शाखा) तसेच सहाय्यक अभियंता किसन घेरडे (पिंपळे निलख शाखा) यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी बोलताना नगरसेविका स्नेहा कलाटे म्हणाल्या की, महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी कोणत्याही हवामानात नागरिकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी अहोरात्र कार्यरत असतात. त्यांच्या समर्पित सेवेला सलाम म्हणून हा छोटासा उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमाबद्दल महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरात स्वागत करण्यात आले.




















Join Our Whatsapp Group