पिंपरी (Pclive7.com):- शहरात पावसाने काही दिवसांपासून उघडीप दिली असली तरी मध्यवर्ती भागासह प्रमुख रस्त्यांवरील खड्डे अद्याप कायम असल्याने वाहनचालक आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील एकूण १,४४४ खड्ड्यांपैकी ९२८ खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्ष परिस्थिती याउलट असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. शहरातील अनेक प्रमुख मार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्डे असून त्यांची संख्या पालिकेच्या आकडेवारीपेक्षा कितीतरी अधिक असल्याचा आरोप होत आहे.

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दररोज हजारो वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. दुचाकीस्वारांना विशेषतः मोठा त्रास सहन करावा लागत असून किरकोळ अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे खड्डे तातडीने बुजवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
विशेषतः जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील नाशिक फाटा ते वल्लभनगर या दरम्यानच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या मार्गावरील मोठमोठे खड्डे मेट्रोच्या कामामुळे पडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. मात्र, मेट्रो प्रशासन यासाठी महापालिकेला जबाबदार धरत असून महापालिकेकडूनही ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

दरम्यान, रस्ते बांधकामानंतर काही वर्षे त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी संबंधित कंत्राटदारांवर असते. मात्र, अनेक ठिकाणी कंत्राटदारांकडून ही जबाबदारी पार पाडली जात नसल्याचे दिसून येत आहे. त्याऐवजी महापालिकेकडून इतर ठेकेदारांच्या माध्यमातून डांबर, कोल्ड मिक्स, पेव्हिंग ब्लॉक, बीबीएम आणि काँक्रिटचा वापर करून तात्पुरती डागडुजी केली जात आहे. या निकृष्ट आणि अपुऱ्या दुरुस्तीमुळे काही दिवसांतच रस्त्यांची पुन्हा दुरवस्था होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

निष्काळजी कंत्राटदारांवर महापालिका प्रशासन कोणती कारवाई करणार आणि शहरातील खड्डेमुक्त रस्त्यांचे आश्वासन प्रत्यक्षात कधी पूर्ण होणार, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. वाहनचालक आणि स्थानिक रहिवाशांकडून तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.




















Join Our Whatsapp Group