पिंपरी (Pclive7.com):- काळेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत बंद घरांचे कडी-कोयंडे तोडून चोरी करणाऱ्या सराईत घरफोड्यांच्या टोळीचा काळेवाडी पोलिसांनी अवघ्या सहा तासांत पर्दाफाश केला आहे. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन आरोपींसह एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे.

कैलास अशोक खलसे (वय ४०, भारत नगर पिंपरी), शुभम शांताराम दुबे (वय २७, आदिनाथ नगर धनगर बाबा मंदिराजवळ थेरगाव), आणि एक विधी संघर्षित बालक या आरोपींना पोलिसांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेला १ लाख ८ हजार ९७० रुपये किमतीचा मुद्देमाल, एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, काळेवाडी परिसरातील बंद घर फोडून चोरी झाल्याची तक्रार दाखल होताच काळेवाडी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि खबऱ्यांच्या मदतीने संशयितांचा माग काढण्यात आला. त्यानंतर अवघ्या सहा तासांत आरोपींना ताब्यात घेण्यात यश आले.

तपासादरम्यान आरोपींकडून चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, त्यांच्याकडे अग्निशस्त्रही आढळून आल्याने पोलिसांनी शस्त्रास्त्र कायद्यांतर्गतही कारवाई केली आहे. प्राथमिक तपासात दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले असून, त्यांच्यावर यापूर्वीही विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई काळेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेंद्र बहिरट, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरेंद्र धुमाळे, तपास पथकातील अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक वैभव गुरव, पोलीस हवालदार प्रमोद कदम, अतिक शेख, भारत पारधी, अशोक जायभाये, पोलीस शिपाई रमेश ब्राम्हण, अजय फल्ले, भास्कर भारती, गणेश जाधव, तांत्रिक मदत पोलीस हवालदार मंगेश लोखंडे यांनी मिळुन केलेली आहे.




















Join Our Whatsapp Group