पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रस्तावित सार्वजनिक स्वच्छतागृह धोरणामध्ये महिलांसाठी स्वतंत्र, सुरक्षित, स्वच्छ आणि सर्व आवश्यक सुविधांनी युक्त स्वच्छतागृहांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी माजी नगरसेविका तथा महिला शहर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा गिरिजा प्रवीण कुदळे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

महापालिकेकडून शहरातील सार्वजनिक आणि सामुदायिक स्वच्छतागृहे अधिक स्वच्छ, सुरक्षित, सुलभ आणि सर्वसमावेशक करण्यासाठी नवीन सार्वजनिक स्वच्छतागृह धोरण तयार करण्यात येत आहे. या उपक्रमाचे स्वागत करताना कुदळे यांनी महिलांच्या गरजांचा विशेष विचार करण्याची मागणी केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या ३० लाखांच्या पुढे गेली असून त्यातील जवळपास निम्मी संख्या महिलांची आहे. मात्र, महिलांसाठी उपलब्ध सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या आणि त्यामधील सुविधांमध्ये मोठी तफावत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

महिलांच्या सन्मान, सुरक्षितता आणि आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येक सार्वजनिक स्वच्छतागृहात खालील सुविधा अनिवार्य करण्याची मागणी करण्यात आली आहे.
# स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था.
# आरसा व हात धुण्याची सुविधा.
# पुरेशी प्रकाशयोजना व सुरक्षा उपाय.
# नियमित स्वच्छता व महिला कर्मचाऱ्यांची उपलब्धता.
# लहान बालकांसाठी बेबी चेंजिंग स्टेशन.
# सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन.
# वापरलेल्या सॅनिटरी पॅडच्या विल्हेवाटीसाठी इन्सिनरेटर किंवा स्वतंत्र डिस्पोजल यंत्रणा.

महिलांना सन्मानपूर्वक, सुरक्षित आणि सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या सर्व बाबींचा नव्या सार्वजनिक स्वच्छतागृह धोरणात समावेश करावा, अशी मागणी गिरिजा कुदळे यांनी केली आहे. या मागणीमुळे शहरातील महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांची गुणवत्ता आणि उपलब्धता वाढण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




















Join Our Whatsapp Group