पिंपरी (Pclive7.com):- चाकण उत्तर पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत एका सराईत चोरट्याला अटक केली असून त्याच्याकडून चोरीच्या सात मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

चाकण उत्तर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार मोटारसायकल चोरीच्या घटना घडत असल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला होता. गोपनीय माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी अशोक मधुकर सोनवणे (रा. राळेगण थेरपाळ, ता. पारनेर, जि. अहमदनगर) याला ताब्यात घेतले.

तपासादरम्यान आरोपीकडून चाकण उत्तर, चाकण दक्षिण, यवत आणि उरुळी कांचन पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या सात गुन्ह्यांची उकल करण्यात आली. पोलिसांनी आरोपीकडून चोरीच्या सात दुचाकी जप्त केल्या असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त वसंतराव तेली, पोलीस उपायुक्त मारुती जगताप, सहाय्यक पोलीस आयुक्त योगेश रांजणकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर मोरखंडे तसेच पोलीस हवालदार भैरोबा यादव, प्रीतम ढमढेरे, योगेश कोळेकर, पोलीस शिपाई महेश कोळी, शिवाजी लोखंडे आणि अक्षय सांडभोर यांनी या कारवाईत सहभाग घेतला.




















Join Our Whatsapp Group