पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची सेवा करणाऱ्या सेवेकऱ्यांचा ‘चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने सन्मान
पिंपरी (Pclive7.com):- कासारवाडी-पिंपळे गुरव येथील श्री दत्त साई सेवा कुंज आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम बुधवारी भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाले. त्यानंतर गायक विशालजी रसाळ यांनी सादर केलेल्या भक्तिमय संगीत कार्यक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यांनी सादर केलेल्या सुमधुर भक्तिगीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

यावेळी लोकनेते दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मरणार्थ राबविण्यात आलेल्या ‘आरोग्य वारी पंढरीच्या दारी’ या उपक्रमातील सहभागी डॉक्टर, वारकऱ्यांची चरणसेवा करणारे चरण सेवा करणाऱ्या सेवेकाऱ्यांचा यावेळी आमदार शंकर जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विशेष सन्मान करण्यात आला.
या सोहळ्यास गोसेवक, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विजू शेठ जगताप, जगद्गुरू कृपांकित डॉ. ह.भ.प. चैतनानंदजी महाराज पुणेकर यांच्यासह प्रशासक, त्रिवेणी आश्रम, आर्ट ऑफ लिव्हिंग ब्रह्मचारी माधवानंदजी, शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, सांगवीचे डॉ. अंबादास देवमाने, जिल्हा रुग्णालय रुग्ण कल्याण समिती सदस्य डॉ. देविदास शेलार, दादा वेदपाठक, स्टेट टीचर, आर्ट ऑफ लिविंग वसंत सानप, ह.भ.प. शेखर महाराज जांभुळकर, स्टेट टीचर समन्वयक, आर्ट ऑफ लिविंग माणिक भोंग, तुषार आल्हाट, सुरज आंग्रे, डॉ दिलीप सातव, डॉ दीपक खोडवे मुकुंदराव गुरव, गोरक्षक राजकुमार चौगुले, विनोद बंसल, एम.डी. डायबेटोलॉजिस्ट चंद्रकांत कणसे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी गुरुपौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व विशद करतानाच आश्रमाच्या धार्मिक आणि सामाजिक कार्याचे कौतुक केले.

महोत्सवानिमित्त आर्ट ऑफ लिविंग यांच्या पुढाकारातून आणि पूना सीरॉलॉजिकल इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ११७ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला. धार्मिक उत्सवाला समाजसेवेची जोड देणारा हा उपक्रम विशेष कौतुकाचा ठरला.
यावेळी बोलताना डॉ.देविदास शेलार म्हणाले, “पंढरपूरला जाऊन विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेण्याबरोबरच वारकऱ्यांची सेवा करणे महत्त्वाचे असते. माझ्या सहकाऱ्यांसमवेत वारकऱ्यांच्या आरोग्याची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. आणि हे कार्य करताना मला प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन घेतल्याचा आनंद मिळतो. वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळत आहे, हे मी अहोभाग्य समजतो.”

दरम्यान महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला. श्री दत्त साई सेवा ट्रस्ट, चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट, आर्ट ऑफ लिव्हिंग, दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवार आणि श्री दत्त साई सेवा कुंज आश्रम भक्त परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे गुरुपौर्णिमा महोत्सव श्रद्धा, भक्ती आणि सेवाभावाचा सुंदर संगम ठरला.




















Join Our Whatsapp Group