पिंपरी (Pclive7.com):- घरफोडी करण्यासाठी वाहनांची चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना चिखली पोलिसांच्या डी.बी. पथकाने अटक करून वाहनचोरीचे पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपींकडून चार मोटारसायकली आणि एक ऑटो रिक्षा असा एकूण २ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या वाहनचोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर डी.बी. पथकाने विशेष तपास मोहीम हाती घेतली होती. तपासादरम्यान पोलिसांनी सुमारे १५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. तसेच बातमीदाराकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे राज संतोष बापर्डेकर (वय २३, ताम्हाणे वस्ती, चिखली) आणि शंकरसिंग समंदरसिंग टाक (वय १८, गाडीतळ, हडपसर) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसी चौकशीत आरोपींनी वाहनचोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांच्याकडून चोरीच्या चार मोटारसायकली आणि एक ऑटो रिक्षा हस्तगत करण्यात आली. या कारवाईमुळे चिखली पोलीस ठाण्यात दाखल असलेले वाहनचोरीचे पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.

तपासात अटक आरोपी राज बापर्डेकर हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले असून त्याच्यावर यापूर्वी १२ गुन्हे दाखल आहेत. तर शंकरसिंग टाक याच्यावर हडपसर, येरवडा आणि निगडी पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून तो अनेक प्रकरणांमध्ये वॉन्टेड होता.

ही कारवाई चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांच्या नेतृत्वाखाली डी.बी. पथकाचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमोल फडतरे, सहायक पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण तसेच पोलीस हवालदार किरण काटकर, विनोद व्होनमाने, प्रविण भोमाळे, सुरज सुतार, अरुण साबळे, भरत माने, संतोष भालेराव, अजय गायकवाड, कंठय्या स्वामी, रोहीत मोरे, पोलीस शिपाई अनिल राक्षे व संतोष भोर यांनी यशस्वी रित्या पार पाडली आहे. या कारवाईमुळे वाहनचोरी व घरफोडीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असून चिखली पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.




















Join Our Whatsapp Group