पिंपरी (Pclive7.com):- वाकड-ताथवडे परिसरातील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास अधिक प्रभावी आणि वेगाने पूर्ण करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. या पथकाची धुरा सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) सुनील कुऱ्हाडे यांच्याकडे सोपविण्यात आली असून, पथकात पाच अधिकारी आणि पाच कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

या प्रकरणातील सर्व पुरावे, साक्षीदारांचे जबाब, तांत्रिक माहिती आणि इतर महत्त्वाच्या बाबींची सखोल पडताळणी करण्याचे काम एसआयटीमार्फत केले जाणार आहे. तपास पूर्ण करून लवकरात लवकर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याच्या दृष्टीने पोलिसांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान आरोपीकडून अधिक माहिती मिळविण्यासाठी आणि गुन्ह्याशी संबंधित सर्व बाबींचा उलगडा करण्यासाठी पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे.

पीडितेला जलद आणि योग्य न्याय मिळावा, यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असून तपासात कोणतीही हयगय केली जाणार नसल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. या संवेदनशील प्रकरणामुळे परिसरात संतापाची भावना व्यक्त होत असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.




















Join Our Whatsapp Group