पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासोबतच बांधकाम क्षेत्राला दिलासा देण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी आरएमसी (रेडी मिक्स काँक्रीट) मिक्सर वाहनांना प्रवेशबंदीच्या वेळेत अंशतः सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. आरएमसी असोसिएशनसोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला असून, दि.२९ जुलैपासून पुढील एक महिन्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. त्यानुसार सोमवार ते शुक्रवार सकाळी ११ ते सायंकाळी ५ या कालावधीत आरएमसी मिक्सर वाहनांना शहरातील प्रवेशबंदीतून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे बांधकाम प्रकल्पांना आवश्यक असलेल्या काँक्रीटच्या वाहतुकीला गती मिळणार आहे.

मात्र, सकाळ आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत ही प्रवेशबंदी कायम राहणार आहे. तसेच शनिवार आणि रविवारी सायंकाळी ४ ते रात्री ९ या वेळेतही आरएमसी वाहनांना शहरात प्रवेश दिला जाणार नाही.
या सवलतीसोबत काही महत्त्वाच्या सुरक्षा अटीही घालण्यात आल्या आहेत. प्रत्येक आरएमसी वाहनावर ३६० अंश कॅमेरा बसवणे अथवा क्लिनर ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच चालकांची डीडी (Drunken Drive) मशीनद्वारे नियमित तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, ही सवलत केवळ आरएमसी मिक्सर वाहनांसाठी लागू असून डंपर, हायवा आणि इतर अवजड वाहनांना त्याचा लाभ मिळणार नाही. सर्व सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे. वाहतूक व्यवस्थापन आणि बांधकाम क्षेत्रातील गरजा यांचा समतोल साधण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, पुढील महिनाभरातील अनुभवाच्या आधारे याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे.




















Join Our Whatsapp Group