नगरसेविका मनीषा लांडे यांचे खासदार श्रीरंग बारणे यांना निवेदन
पिंपरी (Pclive7.com):- कासारवाडी येथील रेल्वे क्रॉसिंग फाटक क्रमांक ६९ कायमस्वरूपी बंद करण्याच्या प्रस्तावाला स्थानिक नागरिकांकडून विरोध होत असून, या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी नगरसेविका मनीषा श्याम लांडे यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मनीषा लांडे यांनी निवेदनात म्हटले आहे की, कासारवाडी गाव रेल्वे मार्गामुळे पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागांत विभागले गेले आहे. रेल्वे क्रॉसिंग फाटक क्रमांक ६९ हे दोन्ही भागांना जोडणारे महत्त्वाचे दुव्याचे काम करत आहे. हे फाटक कायमस्वरूपी बंद झाल्यास हजारो नागरिकांना दैनंदिन प्रवासात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल. कासारवाडी पश्चिम भागातील अनेक विद्यार्थी पूर्व भागातील शाळांमध्ये शिक्षण घेतात. फाटक बंद झाल्यास विद्यार्थ्यांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागेल, ज्याचा परिणाम त्यांच्या शिक्षणावर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

तसेच गणेशोत्सव, शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी, गुढीपाडवा, बसवराज महाराज मिरवणूक, ईद-ए-मिलाद तसेच श्री भैरवनाथ यात्रा आणि पालखी सोहळा यांसारख्या विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांसाठी या फाटकाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. फाटक बंद झाल्यास या पारंपरिक कार्यक्रमांच्या आयोजनात गंभीर अडचणी निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

याशिवाय अंत्ययात्रा, आपत्कालीन परिस्थितीतील अग्निशमन दल, रुग्णवाहिका, पोलीस व इतर अत्यावश्यक सेवांसाठीही हा मार्ग महत्त्वाचा असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. फाटक कायमस्वरूपी बंद झाल्यास आपत्कालीन सेवांमध्ये विलंब होऊन नागरिकांच्या सुरक्षिततेवर परिणाम होऊ शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे.
त्यामुळे रेल्वे प्रशासनाशी तातडीने पाठपुरावा करून फाटक क्रमांक ६९ बंद करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी नगरसेविका मनीषा लांडे यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे केली आहे. स्थानिक नागरिकांच्या हितासाठी हा प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.




















Join Our Whatsapp Group