पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची माहे फेब्रवारी महिन्याची तहकूब सभा बुधवारी (दि.२६) रोजी पार पडली. या सभेमध्ये सभाशास्राचे सर्व नियम धाब्यावर बसवून कामकाज करण्यात आले आहे. या सभेमध्ये केवळ चार मिनिटांत अठरा विषय व पाच उपसुचना विषयांचे वाचन न करताच मंजुर करण्यात आलेत. तसेच या उपसुचना न मांडता त्या उपसुचनांना सुचक अनुमोदनही कोणत्याही नगरसदस्यांने दिले नाहीत. तरी देखील त्या उपसुचना मंजुर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सुमारे साडेसातशे कोटींच्या उपसुचनांच्या वैधतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्या तांत्रिकदृष्ट्या बेकायदेशीर ठरतात. कोट्यावधी रुपयांच्या उपसुचना घुसडण्यासाठी सत्ताधारी भाजपने सुनियोजित सभागृहामध्ये गोंधळ घालून उपसुचना न वाचताच घुसडण्यात आल्या आहेत. याबाबत आम्ही त्याच दिवशी पत्राव्दारे दिलेल्या उपसुचनांच्या प्रतींची मागणी केली आहे. परंतु अद्याप प्रशासनाकडेही या उपसुचना आलेल्या नाहीत. त्यामुळे यामध्ये नक्कीच ‘गोलमोल’ आहे. म्हणूनच त्या सर्व उपसुचना रद्द करण्यात याव्यात अशी मागणी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे.
नाना काटे यांनी यासंदर्भात दिलेल्या प्रसिध्दपत्रकात म्हटले आहे की, या सभेमध्ये जुन्या मालमत्तांचा कर वाढविण्याचा प्रस्ताव होता. या करवाढीस राष्ट्रवादीसह शिवसेना, मनसेच्या तसेच भाजपच्या काही नगरसदस्यांनी जोरदार विरोध करुन नागरीकांवर हि करवाढ लादण्यात येऊ नये असे मत मांडले. परंतु सत्ताधारी भाजपची या करवाढीस मूक संमती होती.कारण महापालिका अधिनियमानुसार २० फेब्रुवारी पूर्वी करविषयक प्रस्तांवाना सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळणे आवश्यक असते. मात्र असे असताना माहे फेब्रुवारी दि.२० ची सर्वसाधारण सभा सत्ताधारी भाजपने मुद्दाम तहकूब केली. आणि प्रशासनास करवाढ करण्यास मूक संमती दिली करवाढ हे भाजपचेच पाप आहे. हि मिळकतकर रद्द करावी म्हणून आम्ही विरोधी पक्षातील सर्व नगरसदस्य एकत्र येऊन रस्त्यावर उतरुन जोरदार आंदोलन करुन सदरचा निर्णय रद्द करण्यास भाग पाडू.
वस्तुत: सभाशास्त्राप्रमाणे सर्वसाधरण सभेच्या कार्यपत्रिकेवरील विषयाचे सविस्तर वाचन होऊन त्यांच्यावर सर्वपक्षीय साधक बाधक चर्चा होऊन त्या विषयाला अनुमोदन देऊन निर्णय होणे अपेक्षित असते. तसेच उपसुचनादेखील त्या विषयांशी सुंसगत मांडून पूर्ण वाचन करुन त्या उपसुचनेवर देखील साधक बाधक चर्चा होऊन उपसुचना स्वीकारणे अथवा नाकारणेबाबत निर्णय अपेक्षित असताना कालच्या सर्वसाधारण सभेत जो प्रकार झाला त्यावरुन असे सिध्द होते की, सत्ताधारी भाजपला महासभा संचलन करता येत नाही. राज्यातील सत्ता गेल्याने भाजपचे धाबे दणालेले आहेत.






















Join Our Whatsapp Group