पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेसाठी गोरगरिबांनी अर्ज केलेले आहेत. पण अर्जांची सोडत कधी होणार आहे? याबाबत नागरिक विचारणा करत असून लाभार्थी सोडत त्वरित घेण्याची मागणी मनपा स्विकृत सदस्य दिनेश यादव यांनी झोपडपट्टी निर्मूलन तथा पुनर्वसनचे सहायक आयुक्त राजेश आगळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मनपा घरकुल योजना राबविणार असून त्याला पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत केंद्र सरकारचे सहाय्य असणार आहे. मनपाने दोनदा अर्ज मागविले होते आणि पन्नास हजारांच्या आसपास नागरिकांनी मोठ्या आशा अपेक्षा ठेऊन घरांसाठी अर्ज सादर केलेले आहेत. त्यासोबत पाच हजार रुपयांचा डिमांड ड्राफ्ट घेण्यात आलेला आहे आणि अर्ज सादर करण्याची मुदत संपून जाऊन बराच काळ उलटून गेला आहे.
पुणे मनपा घरकुल योजनेची सोडत मागील काही दिवसांपूर्वी घेण्यात आली होती आणि त्यांनतर त्यांनी लाभार्थी असलेल्या नागरिकांची नावे सार्वजनिक केली होती. पिंपरी चिंचवड मनपाकडून याबाबत काहीही माहिती देण्यात आली नसल्याने नागरिक नगरसेवक आणि मनपा पदाधिकारी यांना विचारणा करत आहेत.
याबाबत दिनेश यादव यांनी मनपा सहायक आयुक्त यांची भेट घेऊन घरकुल योजनेबाबत चर्चा केली आणि लवकरात लवकर लाभार्थी सोडत घेण्याची मागणी केली. प्रत्यक्ष घरे तयार होऊन मिळायला अजुन किती कालावधी लागणार? याबाबत नागरिकांमध्ये चर्चा आहे.
शहरात स्थायिक झालेल्या अनेक नागरिकांना आपल्या हक्काच्या छताची अपेक्षा आहे आणि घरकुलच्या माध्यमातून आपले ते स्वप्न साकार होईल या आशेवर अनेक नागरिक विसंबून बसलेले आहेत. त्यामुळे मनपाने विना दिरंगाई करता या योजनेला गती द्यावी अशी मागणी यादव यांनी केली आहे.





















Join Our Whatsapp Group