पिंपरी (Pclive7.com):- पुणे विद्यापीठाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या 74 व्या महाराष्ट्र राज्य सीनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत पिंपरी-चिंचवडच्या खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. यामध्ये समृद्धी भोईर हिने हप्टेथलॉन प्रकारात सुवर्णपदक पटकावत आपली दमदार छाप पाडली.

हप्टेथलॉन हा सात प्रकारांचा अत्यंत आव्हानात्मक क्रीडा प्रकार असून त्यामध्ये 100 मीटर हर्डल्स, गोळाफेक, हाय जंप, 200 मीटर धावणे, ट्रिपल जंप, भालाफेक आणि 800 मीटर धावणे या स्पर्धांचा समावेश असतो. या सर्व प्रकारांमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे विजेता निश्चित केला जातो. समृद्धी भोईर हिने सातही प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत सर्वाधिक गुण मिळवून सुवर्णपदकावर नाव कोरले. तसेच, मधुरा खांबे हिने ट्रिपल जंप प्रकारात उत्कृष्ट प्रदर्शन करत रौप्यपदक पटकाविले. तिच्या या यशामुळे पिंपरी-चिंचवडच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

समृद्धी भोईर आणि मधुरा खांबे या दोन्ही खेळाडू साई स्पोर्ट्स अकॅडमी येथे सराव करतात. त्यांना सीनियर प्रशिक्षक चंद्रशेखर कुदळे आणि ज्युनिअर प्रशिक्षक ज्ञानेश्वरी कुदळे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. प्रशिक्षकांच्या मेहनतीमुळे आणि खेळाडूंच्या जिद्दीमुळे हे यश शक्य झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
या दोन्ही खेळाडूंच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पिंपरी-चिंचवड शहरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, भविष्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्या यश संपादन करतील, असा विश्वास क्रीडाप्रेमींनी व्यक्त केला आहे.




















Join Our Whatsapp Group